पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेचा घरात घुसून विनयभंग केला तर घरात तोडफोड केली होती. या गुन्ह्यातील दोघांपैकी एकाला दोषी ठरवत ३ वर्षाचा कारावास आणि दंड तर दुसऱ्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. हा निकाल पाचोरा न्यायालयाने दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील एका गावात राहणारी महिला घरी एकटी असतांना गावातील संजू भावडू पाटील आणि नाना एकनाथ पाटील यांनी घरात घुसून महिलेचा विनयभंग केला होता. हा प्रकार सन-२०१६ मध्ये झाला होता. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला पाचोरा न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एल. व्ही. श्रीखंडे यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. यात सरकारपक्षातर्फे ॲड. रमेश माने यांनी प्रभावी युक्तीवाद केला. न्यायालयाने संजू भावडु पाटील यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर नाना एकनाथ पाटील यास न्यायालयाने दोषी ठरवत ३५४ (अ) मध्ये ३ वर्ष कारावास व ५ हजार रुपये दंड तसेच कलम ४५२ मध्ये ३ वर्ष कारावास व ५ हजार रुपये दंड, ३२३ मध्ये १ वर्ष कारावास व १ हजार रुपये दंड केला आहे. तर पिडीत महिलेला ५ हजार ५०० रुपये नुकसान भरपाई सरकार पक्षाकडून देण्यात आली आहे.
यांनी केली कामगिरी
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक जळगाव, अप्पर पोलिस अधिक्षक चाळीसगांव तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी पाचोरा भाग पाचोरा, प्रभारी अधिकारी पाचोरा पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार छबुलाल नामदेव नागरे यांनी केला असुन सरकारी अभियोक्ता रमेश माने यांनी सरकार पक्षातर्फे कामकाज पाहिले आहे. तसेच पैरवी अधिकारी म्हणुन पोहेकॉ दिपक प्रकाश पाटील व पैरवी अधिकारी म्हणून पो.ना. विकास सुर्यवंशी यांनी कामकाज पाहिले.