जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत एका भागात महिलेचा विनयभंग करत तिच्या भावाला लोखंडी रॉड तसेच धारदार शस्त्राने मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता महिला ही ती राहत असलेल्या परिसरात रस्त्यावर उभी असतांना नितीन करणसिंग दहियेकर याने महिलेचा हात पकडला व तिला माझ्यासोबत चल असे म्हणत विनयभंग केला, महिलेचा भाऊ हा सायंकाळी नितीन दहियेकर यास समजविण्यासाठी गेला यादरम्यान नितीन दहियेकर याने महिलेच्या भावसोबत वाद घातला, याचवेळी सनी दहियेकर, राहूल दहियेकर, विजय दहियेकर या तिघांनी महिलेच्या भावाला चापटाबुक्क्यांनी मारहाण केली, तर नितीन याने महिलेच्या भावावर धारधार शस्त्राने वार केले, तर सनी याने लोखंडी रॉडने महिलेच्या भावाला पाठीवर मारहाण करुन जखमी केली, या घटनेत महिलेचा भाऊ जखमी आहे. याबाबत महिलेने दुसऱ्या दिवशी मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन नितीन करणसिंग दहियेकर, सनी दहियेकर, राहूल दहियेकर व विजय दहियेकर या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अतुल पाटील हे करीत आहेत.