जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील महिला ऑटो रिक्षा चालकांना रेल्वे स्टेशन, नवीन बसस्थानक, टावर चौक येथे ऑटो रिक्षा थांबा मिळावा, अशी मागणी लहुजी बीग्रेड महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आशा आंभोरे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. यासंदर्भात जिल्हा प्रशासन आणि महापालिकेला निवेदन देण्यात आले आहे असे देखील त्यांनी सांगितले.
जळगाव शहरात गरीब, होतकरू तसेच बेरोजगार महिला व तरुणी या ऑटो रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करीत आहे, दरम्यान पुरुष रिक्षा चालक हे कोणत्याही स्थानकाजवळ महिलांना ऑटो रिक्षा प्रवासी भरू देत नाही तसेच महिला रिक्षा चालकांशी अरेरावी तसेच अश्लील भाषण करून त्यांच्याशी अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. दरम्यान ऑटो रिक्षा महिला चालक मालक यांनी खाजगी बँकेकडून कर्ज काढून घेतलेल्या असून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व मुलींच्या लग्नाची यासह इतर जबाबदाऱ्या या महिलांवर आहे. ऑटो रिक्षाचा व्यवसाय करण्यास जाणून-बुजून काही रिक्षा चालक पुरुष हे मानसिक त्रास देत आहे, शिवाय वाहतूक विभागाकडून देखील त्यांना त्रास दिला जात आहे. त्यामुळे जळगाव शहरातील रेल्वे स्टेशन, नवीन बस स्थानक आणि टॉवर चौकात महिला ऑटो रिक्षा चालकांना व्यवसाय करण्यासाठी रिक्षाचा थांबा मिळावा, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांना निवेदन देण्यात आले आहे. महिला ऑटो रिक्षा चालकांच्या मागण्या पुर्ण कराव्या अशी मागणी लहूजी बिग्रेड महिला आघाडीच्या प्रदेशअध्यक्षा आशा आंभोरे यांनी मंगळवारी ४ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता पत्रकारांशी बोलतांना केली आहे. याप्रसंगी महिला रिक्षा चालक माधुरी भालेराव, माधुरी निळे, पौर्णिमा कोळी, पूनम गजरे, रंजना पवार, मालू सोनवणे, मनीषा सुरडकर, सरला पानपाटील, संगीता बारी, लीना सोनवणे, मीना कोळी, रंजना सपकाळे, जयश्री कुवर यांच्यासह इतर महिला रिक्षा चालक उपस्थित होत्या.