भुसावळ, प्रतिनिधी | महिला सुरक्षेचा प्रश्न बिकट होत चालला असून सायंकाळनंतर शहरात व ग्रामीण भागात प्रवासाच्या वेळेस अनेक समस्या निर्माण होतात. भुसावळात कोणत्याही वेळी असुरक्षितता किंवा मदतीची गरज असल्यास महिलांसाठी, विद्यार्थिनींना शिवसेनेने ‘हाक तुमची, साथ शिवसैनिकांची’ हे अभियान शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दिनांक २३ जानेवारीपासून प्रारंभ करण्यात आला.
शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भुसावळात “भगवा पंधरवडा” राबविण्यात येणार आहे. शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे यांच्या संकल्पनेतून भुसावळात शिवसेना जळगाव जिल्हा प्रमुख व आमदार चंद्रकांत पाटील, उपजिल्हा संघटक विलास मुळे, तालुका प्रमुख समाधान महाजन, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख श्याम श्री गोंदेकर, उपतालुका प्रमुख समाधान पाटील व शिवसैनिक, युवासैनिकांच्या उपस्थितीत ‘हाक तुमची, साथ शिवसैनिकांची’ हे अभियानास सुरुवात करण्यात आली. कोणत्याही क्षणी भ्रमणध्वनीवरून शिवसेना कार्यकर्त्यांशी संपर्क साधताच काही वेळातच मदतीसाठी घटनास्थळी कार्यकर्ते हजर होणार आहेत. भुसावळात ४० रिक्षांच्या मागे तसेच २० अतीमहत्वाच्या ठिकाणी हे भ्रमणध्वनीचे पत्रक लावण्यात आले असून त्यावर शिवसैनिकांची व शहर, बाजार पेठ व तालुका पोलीस स्टेशनचे क्रमांक व निर्भया पथकाचे क्रमांक देण्यात आले आहेत. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. भुसावळ तालुक्यातील सामाजिक उपक्रमांची सुरुवात करण्यात आली. महिला सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. महिलांवर अन्याय अत्याचाराचे प्रकार घडत आहेत. नुकतीच हैदराबाद येथे घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण देश हादरून गेला. दरम्यान, मानवी जीवन धावपळीचे होत असल्याने महिलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या भागातील महिलांना निर्भिड व निसंकोचपणे प्रवास करता यावा, यासाठी शिवसेनेने एक अभियान राबविण्याचा संकल्प केला आहे असे तालुका प्रमुख समाधान महाजन यांनी सांगितले.
शिवसैनिक व मतदार नोंदणी अभियान : भुसावळ शहरातील १०० नागरिकांनी शिवसैनिकांची नोंदणी केली तसेच नव मतदार नोंदणी अभियानाअंतर्गत २५० नागरिकांनी नोंदणी केली. शहरातील दक्षिण भागातील १० शिवसेना शाखांची पुनउर्भारणी, शाखा प्रमुखांची निवड करण्यात आली असून नागरिकांना ठाकरे सरकारच्या विविध योजना घराघरात पोहचवण्याचा संकल्प केला असल्याचे शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे यांनी सांगितले. गणेश पाटील, मनीष महाजन, निखिल ब-हाटे, भैया भोळे, नेहाल बोरेले, रवी पवार, हरीश ब-हाटे, हर्षल चौधरी, निळू बोरेले, कांचन ब-हाटे, संजय परिस्कर, सचिन चौधरी, सुनील बोंडे यांनी परिश्रम घेतले.