नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात यंदा महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. भाविकांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता, प्रशासनाने आणि देवस्थान ट्रस्टने दर्शनाच्या वेळेत महत्त्वाचे बदल केले आहेत. येत्या रविवारी (दि. १५ फेब्रुवारी) महाशिवरात्रीनिमित्त भाविकांना त्र्यंबकराजाचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी मंदिर सलग ४१ तास उघडे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रविवारी पहाटे ४ वाजल्यापासून सोमवारी रात्री ९ वाजेपर्यंत मंदिर सलग उघडे राहणार आहे. मात्र, गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी १४ ते १६ फेब्रुवारी या काळात सर्व प्रकारचे ‘व्हीआयपी’ आणि ‘देणगी दर्शन’ पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. भाविकांना मुख्य दर्शन रांगेतूनच (पूर्व दरवाजा) दर्शन घ्यावे लागेल. तसेच, सुरक्षिततेच्या कारणास्तव भाविकांना गर्भगृहात जाण्यास मनाई करण्यात आली असून बाहेरील दर्शनबारीतूनच दर्शन घेता येणार आहे.

स्थानिक त्र्यंबकवासियांसाठी देवस्थानने विशेष सवलत दिली आहे. रविवारी पहाटे ४ ते १० आणि सायंकाळी ६ ते दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत स्थानिकांना पश्चिम दरवाजातून दर्शन घेता येईल. यासाठी आधारकार्ड किंवा इतर ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष कैलास घुले यांनी स्पष्ट केले आहे.
महाशिवरात्रीनिमित्त रविवारी रात्री ११ वाजता विशेष महापूजा होऊन मंदिर प्रांगणात पालखी मिरवणूक काढण्यात येईल. सोमवारी दुपारी ३ वाजता त्र्यंबक राजाची शाही पालखी शहरातून कुशावर्त तीर्थाकडे प्रस्थान करेल. धार्मिक विधींसोबतच रविवारी दुपारी ४ वाजता ‘अघोर नृत्य’ आणि सायंकाळी ७ वाजता सुधीर फडके यांच्या ‘गीत रामायणाचा’ कार्यक्रम होणार आहे. सोमवारी सायंकाळी शास्त्रीय कथक नृत्याचे सादरीकरण केले जाईल. या पवित्र पर्वकाळात गोदावरीच्या उगमस्थानी दर्शन घेण्यासाठी देशभरातून लाखो भाविक दाखल होण्याची शक्यता असून, त्या दृष्टीने चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.



