जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जळगाव जिल्हा शाखेचा संकल्प व प्रेरणा मेळावा रविवारी दि. ९ एप्रिल रोजी शहरात नूतन मराठा महाविद्यालय येथील बोस सभागृहात सकाळी ११ ते ४ यावेळेत घेण्यात येणार आहे. मेळाव्याला जिल्ह्यातील २१ शाखांच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती राहणार आहे.
बैठकीला निरीक्षक म्हणून राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे (नाशिक)आणि राज्य सरचिटणीस विनायक सावळे (नंदुरबार) यांची उपस्थिती राहणार आहे. तर राज्य पदाधिकारी डॉ. प्रदीप जोशी, प्रा. डी.एस. कट्यारे यांची मार्गदर्शक म्हणून उपस्थिती राहील. प्रसंगी २०२३-२४ ची जिल्हा कार्यकारिणीची निवड निरीक्षक करतील. त्यानंतर राज्य कार्यकारिणीने घेतलेल्या विविध निर्णयांबाबत निरीक्षक माहिती देतील.
नूतन जिल्हा कार्याध्यक्ष व प्रधान सचिव यांचे मनोगत आणि नूतन जिल्हा कार्यकारणी पदाधिकाऱ्यांचे कामकाजाचे वार्षिक नियोजन केले जाईल. शाखांचे अहवाल सादरीकरण होतील. बैठकीला जिल्ह्यातील शाखांच्या कार्याध्यक्ष, प्रधान सचिव यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र चौधरी यांनी केले आहे.