नवी दिल्ली : वृत्तसंस्था । काही दिवसांपासून मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढत आहेत . त्याचप्रमाणे मागच्या आठवडयात केरळ, पंजाब, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातही रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून आले.
महाराष्ट्राप्रमाणे पंजाबमध्येही मागच्या आठवड्याभरात अचानक रुग्णवाढ दिसून आली आहे. मागच्या २४ तासात पंजाबमध्ये ३८३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. मागच्या आठवड्यात महाराष्ट्रात अचानक करोना रुग्णवाढ दिसून आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे सरकारला राज्याच्या काही भागात निर्बंध लागू करावे लागले आहेत.
शुक्रवारी संपूर्ण देशामध्ये फक्त महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. मागच्या २४ तासात ६,११२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. भारतात सध्याच्या घडीला १ लाख ४३ हजार १२७ रुग्ण उपचाराधीन आहेत. मागच्या सात दिवसात केरळमध्ये मोठया संख्येने रुग्णांची नोंद होतेय. छत्तीसगडमध्ये रुग्णांचा आकडा वाढतोय. मागच्या २४ तासात तिथे २५९ नव्या रुग्णांची नोंद झाल्याचे केंद्राने म्हटले आहे.
कोरोनाच्या फैलावाची साखळी तोडण्यासाठी नियमांचे पालन आवश्यक असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. देशभरातील अॅक्टीव्ह केसेसपैकी फक्त महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यातूनच ७५.८७ टक्के रुग्ण असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. मागच्या २४ तासात देशातील १८ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये कोरोनामुळे एकही मृत्यू झाल्याची नोंद नाहीय.