नाशिक वृत्तसंस्था । राज ठाकरेंच्या महामोर्चामागे कोणीही असलं तरी काही फरक पडत नाही”, असा टोला अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला आहे. याशिवाय बांगलादेश किंवा पाकिस्तानच्या घुसखोरांना हाकलण्याचा कार्यक्रम आजचा नाही तो 20 वर्षांपूर्वीचा आहे, असा दावा देखील भुजबळ यांनी केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज (9 फेब्रुवारी) बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मुंबईत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. “लोकशाहीमध्ये आपले मत मांडण्याचा आणि मोर्चा काढण्याचा सगळ्यांना हक्क आहे. मुंबईतील आजच्या मोर्चामागे कुणीही असलं तरी काही फरक पडत नाही. लोकशाहीमध्ये सगळ्यांना इकडून तिकडे, तिकडून इकडे जाण्याचा अधिकार आहे. पण आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत”, असा चिमटा छगन भुजबळ यांनी काढला.
मुंबईत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात आज (रविवार 9 फेब्रुवारी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चा निघाला आहे. गिरगाव चौपाटीवरील हिंदू जिमखान्यापासून मोर्चा काढण्यात आला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या परिवारासह या मोर्चात सहभागी झाले आहेत. ते लवकरच आझाद मैदानावरील सभेला संबोधित करणार आहेत. दरम्यान, या मोर्चासाठी ठाणे, पालघर, पुणे, नाशिकसह राज्यभरातील मनसैनिक मुंबईत दाखल होत मोर्चात सहभागी झाले आहेत. राज ठाकरेंच्या सभेसाठी मुंबईतील आझाद मैदानात जय्यत तयारी करण्यात आली आहे.