भुसावळ, प्रतिनिधी | शहरातून जाणाऱ्या चौपदरी महामार्गासाठी शासनाने जमीन अधिग्रहित करून कामही सुरु केले आहे, मात्र चार महिने उलटूनही त्याबद्दल मोबदला दिला नसल्याचा आरोप जमीन मालक अग्रवाल यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी आक्षेप घेवून महामार्गाचे काम रोखून धरले आहे.
अधिक माहिती अशी की, जितेंद्र रामकृष्ण अग्रवाल व प्रमोद श्यामकांत अग्रवाल यांची चार हजार चौरस फुट जागा या महामार्गासाठी अधिग्रहित करण्यात आली आहे. तेथे रस्त्याचे कामही सुरु करण्यात आले आहे. पण त्यांना जागेचा मोबदला देण्यात आलेला नाही. त्याबद्दल विचारणा केली असता अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात त्यामुळे त्यांनी आज (दि.२१) अखेर काम रोखून धरले आहे. हे काम सरू व्हावे म्हणून तेथे उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांना येत्या सहा महिन्यात मोबदला मिळवून देण्याचे लेखी आश्वासन दिले आहे, मात्र लेखी देताना संबंधित अधिकाऱ्याने आपले नाव व पद सांगण्यास टाळाटाळ केली, तसेच प्रतिक्रिया देण्यासही नकार दिल्याने साशंकता निर्माण झाली आहे.