जळगाव,प्रतिनिधी । शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून बऱ्याच वेळा अँटीजन टेस्ट किटचा तुटवडा निर्माण होत आहे. जळगाव मनपाला अँटीजन टेस्ट किट देण्यासाठी राज्यातील काही मान्यवरांना महापौर सौ.भारती सोनवणे यांनी विनंतीपत्र पाठविले असता मुंबई विधानपरिषद सदस्य आ.रमेश पाटील यांनी ८ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
जळगाव शहरातील नागरिकांची कोरोना तपासणी तात्काळ होण्यासाठी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी शासन आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करून अँटीजन टेस्ट किट उपलब्ध करून घेतल्या होत्या. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अँटीजन टेस्ट किटचा तुटवडा भासू लागला. नागरिकांची तात्काळ तपासणी होण्याकामी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी राज्यातील काही मान्यवरांना पत्र पाठवून अँटीजन टेस्ट किट उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली होती. तसेच मनपा फंडातून देखील अँटीजन किट खरेदी करण्यासाठी आयुक्तांना पत्र दिले होते.
आ.रमेश पाटील यांनी दिला निधी
महापौर सौ.भारती सोनवणे यांच्या पाठपुराव्यामुळे नवी मुंबई येथील भाजपचे विधान परिषद सदस्य आ.रमेश नारायण पाटील यांनी स्थानिक विकास निधी अंतर्गत ८ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. जळगाव मनपाला अँटीजन टेस्ट किटचा मुबलक पुरवठा करण्यासाठी या निधीचे नियोजन करावे असे पत्र आ.पाटील यांनी महापौर यांना पाठविले आहे. महापौरांनी सदर पत्राची प्रत जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकारी यांना दिली आहे.
शहरवासियांना होणार फायदा : महापौर
जळगाव शहरासाठी निधी उपलब्ध झाल्याने त्यातून पुन्हा नव्याने अँटीजन टेस्ट किट खरेदी करता येणार आहे. त्यामुळे जळगाव शहरवासियांना फायदा होणार असून त्यांची कोरोना चाचणी तात्काळ करून त्यांना वेळीच उपचार देणे शक्य होणार आहे. राज्यातील आणखी इतर काही मान्यवरांशी संपर्क केला असून त्यांच्याकडून देखील मनपाला मदत होण्याची शक्यता असल्याचे महापौर सौ.भारती सोनवणे यांनी सांगितले आहे.