जळगाव, प्रतिनिधी । शहराच्या विकासासाठी प्राप्त झालेल्या १० कोटींच्या निधीतील कामे पूर्वीच ठरलेली असल्याने जिल्हा नियोजन समितीतुन १० कोटींचा विशेष निधी मिळावा अशी मागणी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे केली होती. महापौरांच्या मागणीला यश आले असून पालकमंत्र्यांनी नियोजन मंडळाच्या बैठकीत १० कोटींचा निधी देण्याचे जाहीर केल्याची माहिती नियोजन समिती सदस्य नितीन बरडे यांनी दिली.
जळगाव शहराच्या विकासासाठी विविध योजनेंतर्गत १० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. निधीतील कामांचे प्रत्येक प्रभागाला ४० लाख याप्रमाणे नियोजन करण्यात आले होते मात्र अगोदरच झालेल्या महासभेत इतर कामांना मंजुरी देण्यात आल्याचे लक्षात आल्याने नव्याने सुचविलेली कामे थांबणार होते. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी लागलीच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याशी याबाबत चर्चा करून डीपीडिसीतुन निधी देण्याची विनंती केली होती.
शुक्रवारी सकाळी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी अजिंठा विश्रामगृह येथे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, नितीन बरडे, गणेश सोनवणे आदी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी महापौरांना आश्वासन देत डीपीडिसीतून निधी देण्याचे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी झालेल्या बैठकीत आ. सुरेश भोळे यांनी १० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याचा मुद्दा उपस्थित केला असता पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी याबाबत महापौर सौ. भारती सोनवणे यांच्याशी चर्चा झाली असून डीपीडिसीतून १० कोटींचा निधी देणार असल्याचे सांगितले. जिल्हा नियोजन समिती सदस्य नितीन बरडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. महापौरांनी केलेल्या मागणीला यश आले असून प्रत्येक प्रभागासाठी ४० लाखांचा निधी उपलब्ध होणार आहे.
दरम्यान गाळे प्रश्न बिकट झाला असून गाळेधारकांना उद्या आपल्या गाळ्यांचे काय होईल याचीच चिंता सातवीत असल्याचा मुद्दा नितीन बरडे यांनी बैठकीत उपस्थित करत आयुक्तांना या गाळेधारकांवर कारवाई करू नका असे आदेश देण्याची मागणी केली. पालकमंत्री या नात्याने शहरातील प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेऊन शासनाकडे बैठक आयोजित करून लोकप्रतिनिधी, व्यापारी, अधिकारी यांना बोलवून यातून काहीतरी मार्ग काढावा अशी मागणी केली. यावेळी पालकमंत्री ना. पाटील यांनी लोकप्रतिनिधी, व्यापारी यांच्याकडे नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे १५ तारखेला बैठक आयोजित केल्याची माहिती दिली.
बैठकीत घनकचरा प्रकल्पातील वीज कनेक्शन बंद असल्याचे आ. राजूमामा भोळे यांनी लक्ष वेधले असता हंजीर बायोटेक बायोटेककडे १८ लाख रुपयांची थकबाकी असल्याचा खुलासा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी करत आधी थकबाकी भरा नंतर वीज कनेक्शन देऊ असा पवित्रा घेतला.