महापौरांच्या पत्रानंतर कामांचा दर्जा, प्रत तपासण्यासाठी विशेष अधिकारी नियुक्त

 

 

जळगाव,प्रतिनिधी  । शहरात विविध योजना, अनुदान निधी अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचा दर्जा आणि प्रत राखली जात नसल्याच्या तक्रारी आल्याने कामांचा दर्जा, प्रत तपासण्यासाठी विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, त्यांच्या पाहणी शिवाय मक्तेदाराला बिल अदा करू नये असे पत्र महापौर जयश्री महाजन यांनी मनपा आयुक्तांना दिले होते. महापौरांच्या पत्रानंतर आयुक्तांनी याबाबत आदेश काढले असून २ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

महापालिकेस शासनाकडून विविध योजना, अनुदान निधी जसे नगरोत्थन, दलितवस्ती सुधारण, दलितेतर वस्ती सुधारणा, विशेष व इतर निधी प्राप्त होत असतात. सदर निधी अंतर्गत जळगांव शहर महानगरपालिका हद्दीत विविध प्रभागात अनेक विकास कामे हाती घेण्यात येतात. मात्र शासकिय निधी अंतर्गत करावयाच्या विकास कामांचा निर्धारीत दर्जा जोपासला जात नसून बहुतांश कामे निकृष्ठ दर्जाने होत असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेतर्फे विविध शासकिय निधी अंतर्गत प्रस्तावित व सुरु असलेल्या कामाची प्रत, दर्जा तपासणी कामी आश्यकता भासल्यास आपणाव्दारे तसेच आपला कामाचा व्याप बघता यासाठी मनपाचे अनुभवी अभियंता नरेंद्र जावळे (प्र.क्र. १ ते १० साठी) व विलास सोनवणी (प्र.क्र. ११ ते १९ साठी) यांची नेमणुक करुन त्यांचेमार्फत कर्तव्य कटाश्याने तपासणी करुनच उत्तम दर्जाने निर्धारीत केलल्या निकषाप्रमाणे काम पूर्ण झाल्याची खात्री केल्यानंतरच संबंधीत मक्तेदार यांना त्यांची देय्यके अदा करावीत जेणे करुन जळगांव शहरातील कामांचा दर्जा सुधारेल व शहराची ढासळलेली प्रतिमा सुधारेल, असे पत्र महापौर जयश्री महाजन यांनी मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी यांना बुधवारी दिले होते. महापौरांच्या पत्राची दखल घेत आयुक्तांनी गुरुवारी तसे आदेश जारी केले असून मनपा अधिकारी नरेंद्र जावळे व विलास सोनवणी यांची नियुक्ती केली आहे.

Protected Content