महापालिका कर्मचाऱ्याला लोखंडी रॉडने मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुन्या भांडणातून महापालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेल्या तरुणाला चार जणांनी लोखंडी रॉडसह लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना गुरूनानक नगरात घडली आहे. यासंदर्भात शनीपेठ पोलीस ठाण्यात तीन तरुणांसह एका अल्पवयीन मुला गुन्हा दाखल झाला आहे.

 

जळगाव शहरातील गुरुनानक नगरात विशाल सुभाष पवार वय ३४ हा तरुण वास्तव्यास आहे. तो महापालिकेत सफाई कामगार म्हणून कामाला आहे. विशाल याचा लहान भाऊ याच्यासोबत गुरुनानक नगरातीलच  सागर गोयर याच्यासह त्याच्या भावंडांचे भांडण झाले होते. याबाबत विशाल पवार याने सोमवारी दुपारी ४ वाजता गुरुनानक नगरात रामदेवजी बाबा मंदिराजवळ सागर गोयर यास विचारणा केली, याचा राग आल्याने सागर गोयर, पियुष पंडीत गोयर, प्रथम पंडीत गोयर व एक अल्पवयीन अशा चार जणांनी शिवीगाळ करत विशाल यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, यादरम्यान सागर गोयर व इतर दोघांनी लोखंडी रॉडने विशाल याच्या पाठीवर तसेच उजव्या हातावर मारहाण करत दुखापत केली, या घटनेत विशाल हा जखमी झाला आहे. याप्रकरणी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास जखमी विशाल याच्या तक्रारीवरुन  सागर रमेश गोयर, पियुष पंडीत गोयर, प्रथम पंडीत गोयर व एक अल्पवयीन सर्व रा. गुरुनानक नगर या चार जणांविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मनोज येऊलकर हे करीत आहेत.

Protected Content