Home Cities जळगाव महात्मा फुले जयंती व छत्रपती शिवाजी महाराज जयंती एकत्र साजरी

महात्मा फुले जयंती व छत्रपती शिवाजी महाराज जयंती एकत्र साजरी


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री संत सावता माळी पंच मंडळाच्या वतीने संयुक्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ आयोजित या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

या कार्यक्रमात महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सामाजिक समता, शिक्षण आणि स्वराज्याचा संदेश देणाऱ्या या दोन महान विभूतींच्या कार्याची यावेळी उपस्थितांनी आठवण काढली. त्यांच्या विचारांमुळे समाजाला दिशा मिळाली असून आजच्या पिढीने त्यांचे आदर्श अंगीकारण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाला आमदार राजू मामा भोळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यावेळी नगरसेवक नरेंद्र पाटील, अतुल बारी, सुरेश सोनवणे, माजी नगरसेवक विजय पाटील, चंद्रकांत कोळी तसेच संत सावता माळी पंच मंडळाचे अध्यक्ष दिनेश महाजन, ईश्वर माळी यांच्यासह समाजातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व समाजबांधवांनी एकत्र येत अभिवादन करत एकात्मतेचा संदेश दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप माळी यांनी केले. उपस्थितांनी महात्मा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजात समता, बंधुता आणि प्रगतीचा मार्ग स्वीकारण्याचा संकल्प व्यक्त केला.

 


Protected Content

Play sound