मला खोट्या प्रकरणात अडकवण्याचे कारस्थान : नवाब मलीक

मुंबई प्रतिनिधी | केंद्रीय यंत्रणा मला खोट्या प्रकरणात अडकवण्याचे कारस्थान करत असून माझी अवस्था अनिल देशमुख यांच्या प्रमाणेच करण्याचा कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री तथा राष्ट्रवाचीचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी आज केला आहे.

 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्रीय यंत्रणांवर गंभीर आरोप केला आहे. आज पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत आरोप केला. याप्रसंगी ते म्हणाले, दोन महिने झाले, आर्यन खान प्रकरणात आम्ही चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. तेव्हापासून माझ्यावर आणि माझ्या कुटुंबियांवर पाळत ठेवली जात आहे. याबाबत एकाचा पाठलाग आमच्या हितचिंतकांनी केला. त्यावेळी ते पळाले. या संशयितांची माहिती ट्विटरवर अनेकांनी दिलीय. या लोकांचं ट्विटर हँडल पाहिलं असता ते भाजपाशी संबंधित असल्याचं दिसत आहे.

नवाब मलिक पुढे म्हणाले, अनिल देशमुख यांच्याविरोधात ज्या पद्धतीने खोटी तक्रार करून त्यांच्याविरोधात कारवाई सुरू झाली, तसंच माझ्याबाबत केलं जातंय. माझ्या हाती याविषयी पुरावे लागले आहेत. केंद्रीय यंत्रणांचे काही अधिकारी स्वतः लोकांना माझ्याविरोधात मसुदा तयार करून पाठवत आहेत. त्यांना ईमेल आयडी देत आहेत. त्यांना माझ्याविरोधात खोट्या तक्रारी करायला लावत आहेत. याचे पुरावे माझ्या हाती लागले आहेत. या प्रकरणी मी पोलिसांकडे तक्रार करणार आहे.  माझ्याकडे जे पुरावे आहेत ते खरे पुरावे आहेत. अधिकार्‍यांच्या व्हॉट्सअप चॅटही मला मिळाल्यात. मी अमित शाह यांनाही तक्रार करणार आहे. त्यांचे अधिकारी असं काम करत असतील तर ते काय कारवाई करतात हे आम्ही बघू, असं मलिकांनी सांगितलं.

Protected Content