मुंबई : पूजा चव्हाणच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणावर आवाज उठविणार्यांना धमक्यांचे फोन येत आहेत. आता मी देखील यावर आवाज उचलला असून कुणात हिंमत असेल तर मला कॉल करा असे आव्हान भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केले आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांना धमकीचे फोन आले असून त्यांनी स्वत: ट्विट करत माहिती दिली होती. चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेऊन गंभीर आरोप केला होता. या प्रकरणी सुरुवातीला दबक्या आवाजात मंत्री राठोड यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, वाघ यांनी थेट सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांसमोर येऊन संजय राठोड यांचं नाव घेतलं. त्यामुळे वाघ यांना धमकीचा फोन आल्याचे दिसून आले आहे.
यावर आता आमदार नितेश राणे यांनी खुले आव्हान दिले आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. तर, मला फोन येत नाही, याचं दुःख झालं आहे. मलाही फोन करा, मलाही बरं वाटेल. माझा नंबरही देतो, घ्या फोन करा. फोन आला तर बाकीच्या गोष्टींवर मीही बोलू शकतो ना. एका मुलीला न्याय देण्यासाठी आमचा पक्ष जबाबदारी म्हणून पुढे येत आहे. सरकार न्याय देत नाही अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी वृत्तवाहिनीशी बोलतांना दिली आहे.