मुंबई : वृत्तसंस्था । केंद्र सरकारने यंदा राज्याच्या हक्काचे जीएसटीचे २०८३३ कोटी रुपये बुडवले. २४ ते ३० एप्रिलसाठी ४.३४ लाख रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याची घोषणा करूनही राज्याला कालपर्यंत केवळ २.२४ लाख इंजेक्शन्स मिळाले. महाराष्ट्राची कोंडी होत असताना मौन बाळगता मराठी बाणा दिल्लीसमोर झुकला का?,” असा टोला आ रोहित पवार यांनी आ अतुल भातखळकर यांना लगावला.
देश कोरोना संकटाला तोंड देत असतानाच नवीन संसद भवनाचं काम केंद्राकडून सुरू ठेवण्यात आलं आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनीही भूमिका मांडली. त्याला भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी उत्तर दिलं. भातखळकरांनी दिलेल्या उत्तराला आता रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे असून, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावरून रोहित पवारांनी भातखळकरांना टोला लगावला आहे.
नव्या संसद भवनाच्या कामावर रोहित पवारांनी टीका केली होती. सध्या देशाची प्राथमिकता काय याचा पुनर्विचार होणं गरजेचं आहे. नागरिकांचं लसीकरण होणं गरजेचं असताना राज्य आर्थिक भार उचलत आहेत, केंद्र सरकार सेंट्रल विस्टा (नवीन संसद भवन) प्रकल्पाचा भार उचलत असून, हे अपेक्षित नाही असं रोहित पवार म्हणाले. त्यावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी उत्तर दिलं होतं. पवार आणि भातखळकर यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असून, रोहित पवारांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.
“युतीत असताना स्व. बाळासाहेब ठाकरे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता ते फक्त उद्धवजींचे वडील? भावना आणि भूमिका सत्तेच्या पलीकडील असतात, असं ऐकलं होतं. परंतु आपल्या भावना सत्ता जाताच बदलल्या. अशी सोयीस्कर भूमिका बदलावी तर तुम्हीच. संसद निश्चित महत्वाची आहे, पण आज लोकांचा जीव महत्त्वाचा असल्याने सगळे स्रोत आरोग्य व्यवस्था बळकट करण्याकडं वळवणं गरजेचं असतांना कोरोनाच्या संकटातही कामगारांना ओढून आणून संसदेचं काम पूर्ण करण्याचा अट्टहास कशासाठी?,” असा सवाल रोहित पवारांनी भातखळकर यांना केला आहे.
“राज्याची स्थिती नाजूक असतानाही राज्याने लसीकरणाचा भार उचलण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारप्रमाणे लसीकरणाची जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलली नाही. देशमुख साहेबांबाबत बोलायचं तर सीबीआय चौकशी पूर्ण होऊद्या. सध्या न्यायप्रविष्ट आहे. तोवर थोडा धीर धरत राजकीय पतंगबाजी टाळली तर बरं होईल. राजकीय वक्तव्य करण्याची ही वेळ नाही. इथं लोकांचे प्राण पणाला लागले आहेत हे विसरू नका!,” असा सल्ला रोहित पवारांनी भातखळकर यांना दिला आहे.