कोल्हापूर : वृत्तसंस्था । मराठा आऱक्षणासाठी घटनेमध्ये दुरुस्ती पाहिजे. राज्यातील ४८ खासदारांनी पंतप्रधानांकडे गेले पाहिजे त्यांच्या पक्षाकडे बहुमत आहे. त्यांनी अन्य राज्यांना यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. या माध्यमातून हा प्रश्न सुटू शकतो, असे मत शाहू महाराजांनी आज व्यक्त केले .
सर्वांचे प्रयत्न गरजेचे आहेत. केवळ संभाजीराजे छत्रपती हे एकटे काही करू शकणार नाही. त्याला सामूहिक ताकत मिळाली पाहिजे,” असं मत श्रीमंत शाहू महाराज यांनी व्यक्त केलं आहे. मराठा आऱक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापुरात छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वात मराठा क्रांती मूक आंदोलनास सुरुवात झाली आहे. यावेळी ते बोलत होते.
“गेल्या काही वर्षात ५८ मूक मोर्चे आणि मुंबईतील मोर्चा शांततेने पार पडले. जनतेमध्ये, समाजात नाराजी असल्याचं मी पाहत होतो. एकमुखाने विषय हाताळण्यापेक्षा एकमेकांच्या विरोधात बोलण्याचं तसंच दुफळी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु होते. संभाजीराजेंनी रायगडावरुन गर्जना केल्यानंतर आम्ही त्यांना भूमिका थोडी बदलली पाहिजे, सौम्य पद्धतीने आणि सर्व समाजाला सोबत घेऊन काम केलं पाहिजे असं सांगितलं. महाराष्ट्राने एकमुखाने पुढे गेलं पाहिजे याच दृष्टीकोनातून हे मूक आंदोलन करण्यात आलं,” असं ते म्हणाले.
“हा आवाज मुंबईपर्यंत जाईलच, पण दिल्लीपर्यंतही कसा नेता येईल याकडे आपल्या सर्वांचं लक्ष असलं पाहिजे,” असं आवाहन शाहू महाराजांनी यावेळी केलं. अजित पवार यांनी भेटीदरम्यान मांडण्यात आलेले मुद्दे रास्त असून योग्य विचार करु असं आश्वासन दिलं होतं अशी माहिती त्यांनी दिली. राज्य सरकार आपल्यासोबत असणार आहे यात मला शंका वाटत नाही असंही यावेळी त्यांनी स्पष्ट करताना सगळंच मिळेल अशी अपेक्षा करु नका असा सल्ला दिला. जे शक्य आहे आणि योग्य आहे ते जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर मिळणं हा मुख्य प्रश्न आहे असं ते म्हणाले
“आपण सध्या विरोधात निकाल लागला आहे येथून सुरुवात केली पाहिजे. हा निकाल कसा बदलता येईल यासाठी अनेक कायदेपंडितांनी विचार केला आहे. अनेक तज्ज्ञांनी पुनर्विचार किंवा क्युरेटिव्ह याचिका आणली तर त्यात दीर्घ काळ वाया जाऊ शकतो आणि त्याचा निकाल काय असेल हेदेखील माहिती नाही. त्यातून काही निष्पन्न होणार नाही असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे,” अशी माहिती छत्रपती शाहू महाराजांनी दिली.
आता केंद्राने हा विषय मनावर घेतला आणि आपल्या बाजूने मांडायचं ठरवलं तरच हा प्रश्न सुटू शकतो,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं. कायद्यात आतापर्यंत इतके बदल झाले असताना आणखी एक बदल करण्यास काय अडचण आहे ? अशी विचारणा करताना मनात आणलं तर सगळं होऊ शकतं असं त्यांनी सांगितलं.
“हा विषय पंतप्रधानांपर्यंत नेला पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण यांनी त्यांच्यासमोर विषय मांडला आहे. पंतप्रधान सकारात्मक असल्याचं सांगण्यात आलं असलं तर अद्याप त्यांचे विचार काय आहेत हे कळालेलं नाही. ते स्पष्ट झालं तर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात येईल. बहुमत असल्याने त्यांच्याकडे जाऊन सोबत येण्यासाठी विनंती केली पाहिजे,” असा सल्ला यावेळी त्यांनी दिला.