मुंबई वृत्तसंस्था । महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अॅमेझॉन वाद आता चिघळण्याची शक्यता आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिंडोशी कोर्टाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. मनसेने अॅमेझॉनविरोधात मराठी भाषेवरुन एक मोहीम सुरु केली आहे. त्यावर अॅमेझॉन कोर्टात गेले. त्यावरुन दिंडोशी कोर्टाकडून राज ठाकरे आणि मनसे सचिवांना नोटीस बजावण्यात असून राज यांना 5 जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले.
अॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय सुरु करावा अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. त्याबाबत मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. अॅमेझॉनकडून दबावतंत्राचा वापर करण्यात येत आहे. असं असलं तरी मनसेची ही मोहीम सुरुच राहील. कारण ही मोहीम मराठी माणसांची, मराठी भाषेसाठी आहे. तसंच कोर्टानं जी नोटीस दिली आहे. त्यावरुन आता अॅमेझॉनला परिणाम भोगावे लागतील, असा इशारा मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी दिलाय.
असा आहे वाद !
अॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरु केलेल्या मोहिमे अंतर्गत अॅमेझॉनविरोधात फलक लावण्यात आले आहेत. यावर ‘नो मराठी, नो अॅमेझॉन’ असा मजकूर लिहण्यात आला आहे. वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहीम, अंधेरी आणि रेक्लमेशनच्या परिसरातील रस्त्यांवर मनसेचे हे फलक पाहायला मिळत आहेत.
अॅमेझॉन’च्या डिजिटल सेवेत मराठीला प्राधान्य देण्याच्या मनसेच्या आग्रही मागणीची अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या प्रतिनिधींनी दखल घेतली होती. जेफ बेझॉस यांना तुमचा ईमेल मिळाला आहे. अॅमेझॉन अॅपबाबत तुम्हाला आलेल्या अनुभवाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. त्यानंतर ‘अॅमेझॉन’चं शिष्टमंडळ मुंबईत आले होते.