जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा गावठाण येथील ग्रामस्थांना मूलभूत सुविधा देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवारी १९ जून रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात आला. याबाबत जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा गावठाण या भागातील घरकुलधारक गेल्या १२ वर्षांपासून वास्तव्याला आहे. यातील बहुतेक आदिवासी समाजाचे लोक या ठिकाणी राहतात. हा गावठाण भाग मन्यारखेडा ग्रुप ग्रामपंचायतीचे अंतर्गत येतो. जळगाव शहरापासून अवघ्या ८ किलोमीटर असलेल्या या गावात मूलभूत सुविधा नाहीत. यात पिण्याचे पाणी, वीज, रस्ते नसल्याने स्थानिक रहिवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, विजेचे एकही खांब नसल्याने रात्रभर अंधारात रहावे लागत आहे. रस्ता काँक्रिटीकरण केलेला नाही त्यामुळे पावसाळ्यात ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहे. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे पाणीपुरवठा मंत्री असून देखील त्यांच्याच मतदार संघात असलेले मन्यारखेडा गावात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. वारंवार निवेदन देवून कोणत्याही मागण्या मान्य न झाल्याने सोमवारी १९ जून रोजी दुपारी १ वाजता हंडा मोर्चा काढण्यात आला.
या निवेदनावर संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, जनहित जिल्हाध्यक्ष चेतन आढळकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उप शहराध्यक्ष आशिष सपकाळे, ललित शर्मा महानगर संघटक प्रशांत बाविस्कर, किरण सपकाळे यांच्यासह मन्यारखेडा गावातील ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.