मगरीच्या गळ्यात अडकलेला टायर काढण्याचे तज्ञांपुढे आव्हान

croc with tyre

जकार्ता, वृत्तसंस्था | इंडोनेशियात एका मगरीच्या गळ्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून एक टायर अडकलाय. या टायरमुळे त्या मगरीला योग्यरित्या खाता-पिताही येत नाही, की सामान्य आयुष्यही जगता येत नाहीये.

 

आता इंडोनेशियाच्या मध्य सुलावेसी प्रांत प्रशासनाने या मगरीचा जीव वाचवण्यासाठी तिच्या गळ्यातून टायर काढणाऱ्या व्यक्तीसाठी बक्षिसाची घोषणा केली आहे. इंडोनेशियाची सरकारी वृत्तसंस्था Antara ने दिलेल्या वृत्तानुसार ही मगर २०१६ पासून गळ्यात टायर अडकलेल्या अवस्थेत फिरतेय.

एका बाइकचा टायर गळ्यात अडकलेली ही मगर सर्वप्रथम २०१६ मध्ये पहिल्यांदा पालू नदीत दिसली होती. १३ फूट म्हणजे जवळपास चार मीटर लांब या खतरनाक मगरीच्या गळ्यातून टायर काढणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखेच आहे. यापूर्वी इंडोनेशियाच्या स्थानिकांनी कधी टायर काढण्याचा प्रयत्न केलाच नाही, असे अजिबात नाहीये. त्यांनी अनेकदा प्रयत्न केले पण यश मिळाले नाही. ही मगर २०१८ मध्ये झालेल्या भूकंप आणि त्सुनामीतूनही वाचली पण विशेष म्हणजे त्यावेळीही टायर काही तिच्या गळ्यातून निघाला नाही.

या मगरीचे फोटो आणि व्हिडिओ नेहमी व्हायरल होत असतात. ते पाहून पशूप्रेमी दुःख व्यक्त करतात आणि स्थानिक अधिकाऱ्यांना सुनावतात. त्या टायरमुळे मगरीचा हळूहळू मृत्यू होतोय, हिच सगळ्यांची चिंता आहे. तो टायर मगरीच्या गळ्यात कसा गेला ? हे कोणालाच माहिती नाही, पण त्या मगरीला कोणीतरी पाळण्याचा प्रयत्न केला होता, असे म्हटले जाते. ती व्यक्ती मगरीचे पालन करु शकली नाही म्हणून गळ्यात टायर अडकवून सोडून दिले असेही सांगितले जाते.

यापूर्वी अधिकाऱ्यांनी तिच्या गळ्यातून टायर काढण्याचा प्रयत्न केले होते, पण ते अयशस्वी ठरले. २०१८ मध्ये पशूतज्ज्ञ मोहम्मद पंजी यांनी मगरीची सूटका करण्याचा प्रय़त्न केला होता. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने मांस खाऊ घालण्याच्या बहाण्याने टायर काढण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांनाही अपयश आले. मात्र, यावेळेस अधिकारी एखाद्या एक्स्पर्ट व्यक्तीकडून हे काम करुन घेऊ इच्छितात. त्यासाठी ‘बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे, पण हे काम सामान्य जनतेने करण्याचे नाहीये. ज्यांच्याकडे योग्य अनुभव असेल तेच हे काम करु शकतात. मगरीच्या जवळ जाऊ नका आणि तिला त्रास देऊ नका, असे आवाहन जनतेला करण्यात आले आहे. हे काम एक्स्पर्ट लोकांचे आहे आणि तेच हे करतील”, असे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले.

“जर अधिक कालावधीसाठी टायर मगरीच्या गळ्यातच अडकून राहिला तर तिचा मृत्यू होऊ शकतो. यासाठी आम्ही तिची सूटका करण्यासाठी एक स्पर्धा आयोजित केलीये. जो व्यक्ती मगरीच्या गळ्यातून टायर काढेल, त्याला बक्षीस दिले जाईल”, अशी घोषणाही मध्य सुलावेसी प्रांताच्या Natural Resources Conservation च्या कार्यालयाकडून करण्यात आली आहे. मात्र, बक्षीस म्हणून किती पैसे दिले जातील, याचा खुलासा करण्यात आलेला नाही. तरी आता या बिचाऱ्या मगरीच्या गळ्यातून टायर काढला जाणार का ? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Protected Content