मुंबई : वृत्तसंस्था । मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या एका फोनमुळे दहशतीचं वातावरण पसरलं आहे, दुपारी पावणे एकच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षात अज्ञात व्यक्तींनं कॉल करुन मंत्रालय उडवून देण्याची धमकी दिली होती .
त्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आणि घटनास्थळाची पाहणी करण्यास पोहोचल्या. मुंबई पोलिसांचे बॉम्बशोधक आणि नाशक पथकाकडून सध्या घटनास्थळाची पाहाणी सुरु आहे. ही अफवा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी तात्काळ हालचाली करत संपूर्ण परिसर निर्मनुष्य केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काळजी घेतली जात आहे. मंत्रालयाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मात्र कोणतीही बॉम्बसदृश गोष्ट या ठिकाणी आढळली नाही. पोलिसांना ज्या क्रमांकांवरून फोन आले त्यांची माहिती पोलीस घेत आहेत. ही अफवा ज्याने पसरवली त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी म्हटले आहे.