अमळनेर,प्रतिनिधी | येथील पाडळसरे धरण जन आंदोलन संघर्ष समितीतर्फे निम्न तापी प्रकल्प अधिकारी कार्यकारी अभियंता मु. शा. चौधरी यांची भेट घेत शासनाच्या मंजूर १३५ कोटींच्या निधी पैकी खर्चिक निधी बाबत विचारणा केली असता यंदाच्या वर्षात आतापर्यंत केवळ २४ कोटी खर्च झाल्याचे सांगण्यात आले तर मंजूर निधी व मागिल बाकी निधी तातडीने मिळावा आणि या मार्चपर्यंत खर्च करण्यात यावा अशी आग्रही मागणी समितीने प्रशासनाला यावेळी केली.
पाडळसरे धरण जन आंदोलन संघर्ष समितीतर्फे निम्न तापी प्रकल्प कार्यालयाला प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. नविन कार्यकारी अभियंता मु .शा. चौधरी यांना निम्न्न तापी प्रकल्पाचा कार्यभार संभाळल्याबद्दल याप्रसंगी धरण जनआंदोलन समितीच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्यात तर सोबत सदर धरणासाठी केंद्र सरकारचा निधी उपलब्ध होणेबाबत कोणती कार्यवाही प्रशासनाच्या पातळीवर सुरू आहे याबाबत विचारणा केली. महाराष्ट्र शासनाच्यावतीने अर्थसंकल्पात मंजूर १३५ कोटींच्या निधी पैकी किती निधी खर्चित करण्यात आला याबाबत समितीने विचारणा केली असता यंदाच्या वर्षात आतापर्यंत केवळ २४ कोटी खर्च झाल्याचे सांगण्यात आले तर मंजूर निधी व मागिल बाकी निधी तातडीने मिळवावा आणि या मार्चपर्यंत खर्च करण्यात यावा अशी आग्रही मागणी धरण जनआंदोलन समितीचे सुभाष चौधरी,हेमंत भांडारकर, महेश पाटील,सुनिल पाटील,रणजित शिंदे, अॅड.तिलोत्तमा पाटील, गोकुळ बागुल, अॅड कुंदन साळुंके आदी प्रमुख पदाधिकारी यावेळी झालेल्या चर्चेत सहभागी झाले होते. शासनातर्फे मंजूर १३५ कोटींचा संपूर्ण निधी तातडीने उपलब्ध व्हावा याबाबत समिती लोकप्रतिनिधी यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे.