भुसावळ (प्रतिनिधी) एकीकडे वाढत्या उष्मामुळे अंगाची लाही लाही होत असतांना दुसरीकडे दुरुस्तीच्या नावाखाली सतत वीज बंद राहत असल्याने नागरिकांसाठी हा कालावधी ‘ताप’दायक ठरत आहेत. वारंवार तक्रारकरूनही दखल न घेतल्याने गुरुवार ९ मे रोजी प्रा.धिरज पाटील यांनी जळगाव विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे तक्रार दाखल केली आहे
भुसावळ येथील विज वितरण कंपनीच्या नियोजन शून्य अनागोंदी कारभारामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. रात्री गाढ झोपेत असतांना काही कारण नसतांना शहरातील वीज पुरवठा वारंवार अचानक खंडित होत असून याची तक्रार कारण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात फोन लावला असता तो उचलण्याचे सौजन्य देखील कर्मचारी दाखवत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर जे कॉल सेंटर आहेत, तेथील दूरध्वनी हे बाजूला काढून ठेवण्याचे अनेक प्रकार सर्रासपणे घडतात. वीजपुरवठा खंडित होऊन तो पुन्हा कधी पूर्ववत होईल, याची माहिती विचारण्यासाठी वीज वितरण कंपनी दुर्लक्ष करत असल्याने देखील नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण होत आहे. थकीत वीजबिल वसुलीसाठी ज्या प्रमाणे लक्ष दिले जाते, त्याधर्तीवर वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याकडेही तेवढेच लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. कर्मचाऱ्यांच्या निष्क्रियेतचा ग्राहकांना फटका:दिवसा उकाड्यात, तर रात्री अंधारात राहावे लागत आहे. वीज वितरणच्या अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांनी समन्वय ठेवून ग्राहकांवरील अन्याय दूर करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त ग्राहकांच्या वतीने देण्यात आला आहे.