भुसावळ प्रतिनिधी । जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्यामुळे देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन केली आहे. नागरिकांनी अजिबात घरातून बाहेर पडू नये असे आवाहन केले असतांना भुसावळ शहरात जळगाव रोड व इतर परिसरात विजेचा लपंडाव २३ मार्च पासून सुरूच राहिला आहे, अश्या तक्रारी नागरिकांनी केले आहे.
कोरोनाचा प्रसार सध्या भारतात वेगाने होत आहेत. यात महाराष्ट्र सर्वात आघाडीवर आहे. मात्र परिस्थिती गंभीर असतानाही भुसावळ शहरात जळगाव रोड व इतर परिसरात विजेचा लपंडाव २३ मार्च पासून सुरूच राहिला आहे, अश्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. त्यावर उपाययोजना न झाल्याने शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धिरज गणेश पाटील, विशाल ठोके, शशिकांत दुसाने, अमोल पाटील, शंतनू पाथरवट व परिसरातील नागरिकांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या कार्यालयात तक्रार दाखल केली आहे.
संचारबंदीत सहा तास वीज गुल
एकीकडे नागरिकांना घरात राहणे आवश्यक असतांना अनियमित वीज पुरावठ्यासह सहा तास वीज गुल झाल्याने नाईलाजास्तव नागरिक रस्त्यावर आले. अश्या परिस्थितीत कोरोना विषाणू पाय पसरवू शकतो. याची जाणीव असून सुद्धा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ठोस उपाययोजना केल्या नाहीत.
नागरिकांना घरातच राहणे झाले मुश्किल
मागील तीन दिवसात तापमानात वाढ झाली आणि अचानक २५ मार्च रोजी अवकाळी पावसाने झोडपले व पून्हा वातावरण तापले अश्या परिस्थितीत नागरीकांना घरातच राहणे मुश्किल झाले होते. अवकाळी पावसाचे कारण अधिकाऱ्यांकडून पुढे करण्यात आले परंतु २३ मार्च पासूनच अनियमित विज पुरवठा होतो होता. नगरपालिका प्रशासनाने कोणतेही निर्जंतुकीकरण केलेले नसल्याने कोरोना व इतर साथीच्या रोगाचा प्रभाव वाढण्याची भयावह परिस्थिती परिसरात निर्माण झाली आहे, त्यातच सहा तास वीज खंडित होणे अधिकच धोकेदायक आहे असे तक्रारीत नमूद केले आहे.
महावितरणच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची अपेक्षा: प्रा.धिरज पाटील
राष्ट्रीय आपत्तीच्या वेळेस कामात दिरंगाई करणे. मुद्दाम अवकाळी पावसाचे कारण पुढे करणे. वारंवार तक्रारी करून सुद्धा खंडित वीज पुरवठा केला जातोय याची माहिती असतांना सुद्धा योग्य नियोजन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी वीज कर्मचाऱ्यांची पाठ थोपटणाऱ्या ऊर्जा मंत्र्यांकडून महावितरणच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची अपेक्षा नागरिकांनी केली आहे.