भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील जाम मोहल्ला मार्गाची अत्यंत दुरवस्था झाल्यानंतरही पालिका प्रशासन दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ सुभाषचंद्र बोस रीक्षा युनियनच्या ७० चालकांनी भीक मांगो आंदोलन केले. शिवाय रीक्षा बंद ठेवून पालिका प्रशासनाच्या कृतीचा निषेध केला.
भुसावळ रेल्वे स्थानकासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते सुभाष पोलिस चौकीपर्यंतचा सुमारे २०० मीटर अंतराचा रस्ता अत्यंत खड्डेमय झाल्यानंतरही पालिका या रस्त्याच्या दुरुस्तीकडे चालढकल करीत आहे. या रस्त्यावरून जाणार्या वाहन धारकांसह रीक्षा चालकांना मोठा त्रास सोसावा लागत असल्याने पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता सुभाषचंद्र बोस रीक्षा युनियनच्या ७० चालकांनी भीक मांगो आंदोलन केले शिवाय रीक्षादेखील बंद ठेवून पालिका प्रशासनाचा निषेध नोंदवला.
युनियनचे अध्यक्ष तस्लीम खान यांच्या नेतृत्वात या रस्त्याच्या डांबरीकरण कामासाठी भीक मांगो आंदोलन करण्यात आले तसेच महामानवांच्या पुतळ्याजवळ ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनातून भिक्षेपोटी मिळालेली रक्कम बंद डब्यात साठवण्यात आली असून ती पालिकेला निधी म्हणून दिली जाणार आहे व रक्कम स्वीकारण्यात न आल्यास मनिऑर्डरने पालिकेला रक्कम दिली जाईल व लेखी आंदोलन मिळत नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच राहील, असेही रीक्षा चालक म्हणाले.