भुसावळ, प्रतिनिधी | शहरातील नाहाटा चौफुलीजवळ असलेल्या पेट्रोल पंपानजीक दि. ११ जानेवारी रोजी एकावर चाकूने प्राणघातक हल्ला करून त्याच्याकडून ३२०० रुपये लुटून नेणाऱ्या व फरार झालेल्या आरोपीस पोलिसांनी १० दिवसांनी शिताफीने अटक केली आहे.
अधिक माहिती अशी की, तालुक्यातील तळवेल येथील रहिवाशी सुनील बाजीराव कोळी हे ११ जानेवारी रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास पेट्रोल पंपाजवळ लघुशंकेसाठी थांबले असता आरोपी तरुण अजय दिगंबर जाधव याने त्यांना तेथे एकांतात चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील ३२०० रुपये रोख हिसकावून घेतले. त्यावेळी फिर्यादी सुनील कोळी यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता आरोपी अजयने त्याच्याजवळ असलेल्या चाकुने फिर्यादीच्या डाव्या बाजुला असलेल्या बरगडीत, उजव्या पायाच्या मांडीमागे व उजव्या हाताच्या पंज्याच्या मधल्या बोटावर वार करून जखमी केले. त्यानंतर तो पसार होवून फरार झाला होता. याबाबत येथील बाजारपेठ पो.स्टे ला भाग ५, गु.र.न १९/२०२० भा.द.वि क.३९७,५०४ व ५०६नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, शहरात नाहाटा चौफुली जवळील पाण्याच्या टाकीजवळ आरोपी अजय जाधव आला असल्याची गुप्त बातमी मिळाल्याने बाजारपेठ पो.स्टे.चे सहा. पो.नि. अनिल मोरे, पो.ना. महेश चौधरी, पो.कॉ.उमाकांत पाटील, तुषार पाटील, कृष्णा देशमुख, प्रशांत परदेशी अश्यांनी लागलीच जावुन त्यास ताब्यात घेतले व पुढील कारवाईसाठी पो.स्टेला आणले. सदर गुन्हयाचा तपास सहा.पो.नि.अनिल मोरे करीत आहेत.