भुसावळ प्रतिनिधी । शहरातील बाजारपेठ, तालुका आणि शहर पोलिस ठाण्यात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खास महिलांसाठी भरोसा सेल कार्यान्वित करण्यात आला आहे.
शहरातील तिन्ही पोलिस ठाण्यात भरोसा सेल सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून महिलांचे समुपदेशन, त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांना कायदेशीर सल्ला देणे, गरज असल्यास महिलेस निवारा देणे, असे उपक्रम राबवले जाणार आहे. या सेल मध्ये शहरातील डॉक्टर, वकील, सामाजिक कार्यकर्ते आणि संबंधित पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी असतील. भरोसा सेलमध्ये मदत मागण्यासाठी येणार्या महिलांच्या अडचणी त्वरित सोडवण्यावर भर दिला जाणार आहे, असे पोलिसांनी सांगितले. भुसावळ शहर पोलिस ठाण्यातील भरोसा सेलचे उद्घाटन वैशाली सोनवणे, शहर वाहतूक शाखेच्या विजया सपकाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डीवायएसपी गजानन राठोड, पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहायक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी उपस्थित होते. तिन्ही पोलिस ठाण्यांमधील भरोसा सेलमध्ये विविध मान्यवर सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.