भुसावळातील कृउबा समितीत भाजीपाला लिलावाला सुरूवात

भुसावळ प्रतिनिधी । लॉकडाऊनचे पालन करत शहरातील स्थानिक टिंबर मार्केटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला लिलाव सुरू करण्यात आले आहे. यावेळी परवानाधारक, घाऊक व्यापारी, आडतदारांच्या माध्यमतून तालुक्यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबून त्यांचा खर्च कमी होईल.

आठवडे बाजार मध्ये होणारा भाजीपाला लिलाव हा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानात स्थलांतरित करण्यात आला होता. मात्र त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्ससिंगचा फज्जा उडाला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने भाजीपाला लिलाव पूर्णपणे बंद करण्यात आले होते. यामुळे भाजीपाला उत्‍पादक शेतकरी व व्यापारी वर्गाला त्रास सहन करावा लागत होता. प्रशासनाने परिणामी त्‍यांना दंड, जप्‍ती, केसेस आदी कारवाई सुध्‍दा केली होती. मात्र आता कृषी उत्पन्न बाजार समितीने आता जिल्हाधिकार्‍यांनी १४ एप्रिल रोजी दिलेल्या आदेशानुसार, घाऊक परवानाधारक व्यापारी व अडतदार यांना घाऊक व्यापाराचे परवाने दिले होते. सोशल डिस्टन्सिंग ठेवत केवळ २० व्यापार्‍यांना बाजार समितीमध्ये सोडण्याचे निश्‍चित करण्‍यात आले होते.

माजी आमदार संतोष चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली कृउबा सभापती सचिन चौधरी, सचिव नितीन पाटील यांनी शेतकरी, आडत, व्‍यापाऱ्‍यांना होणारा त्रास लक्षात घेत लिलाव सुरू करण्‍यासाठी आतील भागात तात्‍काळ आखणी करायला लावली व स्वच्छता करून पथदिवे लावले. कृउबा समिती स्‍थापनेच्‍या ७३ वर्षाच्‍या इतिहासात प्रथमच येथे लिलाव झाला. बाजार समितीच्या लिलाव पध्दतीमुळे भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांचा फायदा होईल. त्यांचा लिलावासाठी होणारा खर्च वाचेल, असे कृउबा सभापती सचिन चौधरी यांनी सांगितले.

Protected Content