
नागपूर (वृत्तसंस्था) ‘सरसंघचालक मोहन भागवत यांच्या छायाचित्रासह ‘भारत का नया संविधान’ या नावाने सोशल मीडियावर एक पीडीएफ फाइल व्हायरल केल्याप्रकरणी दिल्ली, लखनौसह नागपूर येथील कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर संघाच्या नावाने ‘भारत का नया संविधान’ असे १६ पाने असलेली एक पीडीएफ फाइल तयार करून ती व्हॉट्सअॅपवर प्रसारित करण्यात आली आहे. त्यातून संघाची व सरसंघचालक मोहन भागवत यांची बदनामी सुरु आहे. हा मजकूर मानहानीकारक, धमकविणारा व खोटा आहे. सोशल मीडियावर त्याचा प्रसार केला तर देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. कोणीतरी हेतुपुरस्सर, जाणीवपूर्वक व विशिष्ट समाजातील भावना दुखावण्याचा प्रयत्न या माध्यमातून करीत आहे. त्यामुळे हा संदेश पसरविणाऱ्याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.