काठमांडू: वृत्तसंस्था । भारताविरोधात नेपाळची खुमखुमी कमी झालेली नाही. राम जन्मस्थळ भारतात नसून नेपाळमध्ये असल्याचा दावा पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी केला होता. भारतातील अयोध्या खोटी असल्याचे सांगत नेपाळमध्ये ४० एकर जागेवर अयोध्यापुरी धामची निर्मिती करण्यात येत आहे.
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी सांगितले की. माडी नगरपालिकेने अयोध्यापुरी धाम बनवण्यासाठी ४० एकर जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. माडीचे महापौर ठाकूर प्रसाद धाकल यांनी सांगितले की, २९ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीनुसार अयोध्यापुरी धाम निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आमच्याकडे अतिरिक्त ५० एकर जमीन आहे. कोणतीही अडचण आल्यास आम्ही या जमिनीचाही वापर करू असेही त्यांनी सांगितले.
धाकल यांनी सांगितले, अयोध्यापुरी धामच्या निर्मितीसाठी मास्टर प्लान तयार आहे. सविस्तर अहवाल तयार करण्यात येणार आहे. पंतप्रधान ओली यांनी अयोध्या नेपाळमध्ये असल्याचा दावा केल्यानंतर त्यांच्यावर भारतातूनच नव्हे तर नेपाळमधूनही जोरदार टीका झाली होती. या टीकेनंतरही ओली भूमिकेवर कायम आहेत.
ओली यांच्या निर्देशावरच अयोध्यापुरी धाम तयार करण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. स्थानिकांशी चर्चा करून सध्या त्या ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक पुरावे, स्थळ यांना संरक्षित करण्याची सूचना केली आहे. आणखी पुराव्यांसाठी अयोध्यापुरीमध्ये उत्खन्न करण्याचे निर्देश ओली यांनी दिले आहेत.
काही महिन्यांपूर्वी ओली यांनी भारताने सांस्कृतिक अतिक्रमण करण्यासाठी खोटी अयोध्या निर्माण केली असल्याचा आरोप केला होता. खरी अयोध्याही नेपाळमध्ये असल्याचा दावा त्यांनी केला. खरी अयोध्या भारतात असती तर तेथील राजकुमार लग्नासाठी जनकपूर येथे कसे काय येऊ शकतात असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. त्यांच्या या दाव्यावर नेपाळमध्येही टीका झाली होती.