जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील दीक्षितवाडी येथील असलेल्या बुद्ध विहार येथे भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा हटवून विटंबना केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात समाज बांधवांनी ठिय्या आंदोलन केले होते. याप्रकरणी गुरूवारी सायंकाळी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिक्षित वाडी येथील बुद्ध विहार या जागेत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून बसविण्यात आलेला आहे. दरम्यान ही जागा खाजगी असल्यामुळे प्रशांत शरद देशपांडे, अमित एकनाथ पाटील यांनी जेसाबीच्या मदतीने गुरुवार १६ मार्च रोजी सकाळी ८ वाजता पोलीस बंदोबस्तात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हटवण्याचे काम सुरू केले. दरम्यान ही बाब समाज बांधवांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पुतळा हटविण्यात विरोध केला. तब्बल दीड ते दोन तासांपासून समाज बांधवांनी ठिय्या आंदोलन करत पुतळा हटवण्यासाठी विरोध केला होता. त्यानंतर प्रतिष्ठीत नागरीकाच्या मदतीने पुतळा पुन्हा जागेवर ठेवण्यात आला. त्यानंतर संपप्त समाज बांधवांनी दुपारी १२ ते ४ वाजेच्या दरम्यान जिल्हापेठ पोलीस ठाण्यात येवून ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर एका महिलेच्या फिर्यादीवरून प्रशांत शरद देशपांडे, अमित एकनाथ पाटील आणि जेसीबी मालक (पुर्ण नाव माहित नाही) या तिघांविरोधात गुरूवार १६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात करण्यात आला. पुढील तपास पोलीस अधिकारी बबन अव्हाड करीत आहे.