झज्जर, वृत्तसंस्था ।केंद्र सरकारच्या तीन शेतकरी कायद्याविरोधात शेतकरी व विरोधक एकत्र आलेले असतांना भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री बिरेंद्र सिंह यांनी हरियाणातील झाज्जर येथील शेतकरी आंदोलनात शुक्रवारी सहभागी होऊन दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.
देशात शेतकरी आंदोलनावरून वातावरण तापलं असताना भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री चौधरी बिरेंद्र सिंह यांनी शुक्रवारी नव्या शेतीविषयक कायद्यांना विरोध दर्शवला. नव्या कायद्यांविरोधात सुरू असलेलं आंदोलन हे आता केवळ शेतकऱ्यांपुरतंच मर्यादित नसून सर्वांचे (जनसामान्यांचे) आंदोलन झाले आहे असं ते म्हणाले. शुक्रवारी हरयाणाच्या झज्जर जिल्ह्यातील संपला गावात ते शेतकरी आंदोलनात सहभागी झाले. संपला गावातील आंदोलन सर छोटू राम मंचच्या सदस्यांनी आयोजित केलं होतं. चौधरी बिरेंद्र सिंग सर छोटू राम यांचे नातू असल्याने ते आंदोलनात सहभागी झाले अशी चर्चा आहे.
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी होण्याची इच्छादेखील बिरेंद्र सिंग यांनी व्यक्त केली. ‘मी या शेतकऱ्यांसोबत आहे. हे आंदोलन केवळ शेतकऱ्यांचं नव्हे, तर साऱ्यांचं आहे. समाजातील एखाद्या ठराविक गटाचं हे आंदोलन नाही. मी आता शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलो आहे. मी जर आंदोलनात सहभागी झालो नसतो तर लोकांना वाटलं असतं की मी केवळ राजकारण करत आहे. पण आता मी निर्णय घेतला आहे. तुम्ही कोणाशीही चर्चा करा. शिक्षक, विद्यार्थी, कामगार, मजूर, नोकरदार, गृहिणी… साऱ्यांना या आंदोलनाची काळजी आहे. या आंदोलनावर तोडगा निघावा असं सगळ्यांनाच वाटतं. मीदेखील या आंदोलनाशी जोडला गेलो आहे. गेले ५-६ दिवस दिल्लीत थंडी खूपच जास्त आहे, पण ते आंदोलन करत आहेत. मीदेखील लवकरच दिल्लीत जाऊन आंदोलनात सहभागी व्हावं अशी माझी इच्छा आहे’, असं ते म्हणाले.