भाजपाच्याच नेत्याचा येडियुरप्पा सरकारवर २१,४७३ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप !

 

बंगळुरू : वृत्तसंस्था । कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांना पदावरून हटवण्याची मागणी करणारे भाजपाचे आमदार एएच विश्वनाथ यांनी त्यांच्याच सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप लावला आहे.

 

पाटबंधारे विभागाने आर्थिक मंजुरी न घेता घाईत २१,४७३ कोटी रुपयांचा निविदा काढल्याचा आरोप त्यांनी केला. यामध्ये घोटाळा झाला असल्याचे  देखील विश्वनाथ म्हणाले. एएच विश्वनाथ हे विधान परिषद सदस्य आहेत.

 

विश्वनाथ यांनी येडियुरप्पा यांचा मुलगा आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बी वाय. विजयेंद्र यांनी सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप केला. विश्वनाथ पत्रकार परिषदेत म्हणाले, “भद्रा अप्पर कालवा प्रकल्प व कावेरी पाटबंधारे प्रकल्पांशी संबंधित पाटबंधारे विभागात २० हजार कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे कंत्राट तयार केले गेले आहे. वित्त विभागाकडून कोणतीही आर्थिक मंजुरी घेण्यात आली नाही, मंडळाची बैठक घेण्यात आली नाही. हे घाईघाईने केले गेले.”

 

ठेकेदाराकडून लाच घेण्याच्या उद्देश्शाने हे केले गेले. कंत्राटदारांच्या हिताचा विचार करणारे हे सरकार आहे का?”, असा प्रश्न एएच विश्वनाथ यांनी यावेळी केला. विश्वनाथ हे विधान परिषद सदस्य आहेत. त्यांनी दोन वर्षांपूर्वी जनता दलातून भाजपात प्रवेश केला. सरकारच्या मंत्र्यांसह संपूर्ण राज्य विजयेंद्र यांच्या प्रशासनात हस्तक्षेपाबद्दल बोलत असल्याचा दावा देखील त्यांनी केला.

 

विश्वनाथ म्हणाले, “आज कोणता मंत्री समाधानी आहे? प्रत्येक विभागात विजयेंद्र यांचा हस्तक्षेप आहे.” विश्वनाथ यांचे हे वक्तव्य अशावेळी आले ज्यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस कर्नाटकचे प्रभारी अरुण सिंह तीन दिवसांच्या राज्य दौर्‍यावर आहेत. येडियुरप्पा यांना हटविण्याच्या मागणीच्या काही आमदारांच्या पार्श्वभूमीवर सिंग हे कर्नाटकात आमदारांशी चर्चा करण्यासाठी गेले आहेत.

 

Protected Content