नाशिक प्रतिनिधी । महाविकास आघाडीचे नेते भाजपमधून पक्षांतर होणार असल्याच्या पुंग्या सोडत आहेत. मात्र प्रत्यक्षात भाजपमध्येच लवकरच अनेक नेते प्रवेश करणार असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. आज बाळासाहेब सानप यांनी भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केल्यानिमित्त आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते.
माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी आपल्या भाषणातून देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले की, येत्या काळात अनेक लोकांचे भाजपात प्रवेश होणार आहेत, काहीजण रोज वावड्या उठवतात की भाजपाचे लोक आमच्याकडं येणार आहेत. पण, कोणी त्यांच्याकडे जाणार नाहीत, हे त्यांनाही माहिती आहे. त्यांच्याच पक्षातील नाराज आमदारांना संकेत देण्यासाठी या पुंग्या वाजवत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
दरम्यान, महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षात अनेक आमदार नाराज आहेत, त्यामुळे त्यांना दिलासा मिळावा, म्हणून असं बोललं जात असल्याचं फडणवीस यांनी सांगितंल. तसेच, सर्वांना हेही माहितीय की, देशाचं भविष्य हे राहुल गांधी नाही, युपीए नाही. तर, या देशाचं वर्तमान आणि भविष्य हे नरेंद्र मोदीच आहेत. त्यामुळे, एकादं धोक्यानं आलेलं सरकार किती काळ चालतं? कसं चालतं, यासंदर्भातील सगळी माहिती सगळ्यांना आहे. या तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन लढावं ही तर माझीच इच्छा आहे, त्यांनी जरुर लढावं, असं आव्हानंही फडणवीस यांनी महाविकास आघाडीला दिले आहे.