मुक्ताईनगर प्रतिनिधी । गेल्या ४० वर्षांपासून आपण भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी काम केले. याच्या बदल्यात पक्षाने आपल्याला बरेच काही दिले, असे कृतज्ञपणे सांगत एकनाथराव खडसे यांनी आज आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. याच वेळेस आपण केंद्रीय नेतृत्वाविषयी नाराज नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अखेर आपली राजीनाम्याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. आज दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, आपण गेल्या 40 वर्षांपासून पक्षाचे काम केले. अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये पक्षाला वाढवण्याचे काम केले. पक्षाने सुद्धा मला बरेच काही दिले. आपल्या पक्षाच्या नेत्यांवर वा पक्षावर जराही राग नाही. आपण नेतृत्वावर कधीही टीका केली नाही.
भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी चाळीस वर्षात आम्ही अनेकदा अपमान सहन केले. अनेक अडचणीवर मात केली. मला सांगितले जाते की, पक्षाने खूप काही दिले. पण पक्षाने काही दिले असले, तरी यासाठी आम्ही केलेल्या त्यात सुद्धा मोठा होता, असे खडसे म्हणाले.
गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण मुख्यमंत्री पदाचे दावेदार होतो. बहुजन समाजाचा मुख्यमंत्री व्हावा ही आपली इच्छा होती आणि याचपासून मला पक्षातून अडचणी आणण्यास प्रारंभ झाला. माझ्यावर अनेक खोटे-नाटे आरोप करण्यात आले. अनेक चौकशा करण्यात आला, मात्र त्यात काहीही निघाले नसले तरी माझा राजीनामा घेण्यात आला. विशेष बाब म्हणजे विरोधकांनी माझ्या राजीनाम्याची मागणी केली नसताना सुद्धा माझ्यावरती आरोप करत शक्तीने राजीनामा घेण्यात आल्याचे एकनाथराव खडसे म्हणाले.