जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भगीरथ कॉलनीतील वक्रतुंड अपाटमेंट येथे बंद घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याची दागिने आणि रोकड असा एकूण २ लाख ६१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात सोमवारी १७ एप्रिल रोजी रात्री १२.३० वाजता अज्ञात चोरट्यांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, कांचन मधुकर कदम (वय-२८) रा. वक्रतुंड अपार्टमेंट, भगीरथ कॉलनी, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. १४ एप्रिल ते १६ एप्रिल दरम्यान त्यांचे घर बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने बंद घर फोडून आत प्रवेश करत घरातील कपाटातून सोन्याचे दागिने आणि १२ हजार रुपयांची रोकड असा एकूण २ लाख ६१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. कांचन कदम ह्या महिलाघरी आल्यानंतर घराचा मुख्य दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसून आले तर घरातील सामान अस्तव्यस्त पडलेल्या दिसून आला. त्यानुसार त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी १७ एप्रिल रोजी रात्री १२.३० वाजता अज्ञात चोरट्यांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्र पाटील करीत आहे.