नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सर्वोच्च न्यायालयाने ओडिशामधील प्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रा तसेच त्याच्याशी संबंधित इतर सर्व गोष्टींसाठी परवानगी नाकारली आहे.
२३ जून पासून या रथयात्रेला सुरुवात होणार होती. पण रथयात्रेला परवानगी मिळाली तर मोठी समस्या निर्माण होईल याकडे लक्ष वेधणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर आज सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या समोर सुनावणी झाली. कोरोनाचे संकट असताना गर्दी होतील असे कार्यक्रम टाळले पाहिजेत, असे सर्वोच्च न्यायालायने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालायने यावेळी आरोग्य तज्ञांकडून सुरक्षेसाठी सोशल डिस्टन्सिंग तसेच इतर दिलेल्या सूचनांचा उल्लेख केला. गर्दीच्या ठिकाणी करोनाचा फैलाव होण्याची जास्त भीती असल्याचेही यावेळी त्यांनी नमूद केले. लोकांचे आरोग्य आणि सुरक्षा लक्षात घेता रथयात्रेला परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे. दरम्यान, १० ते १२ दिवस चालणाऱ्या या रथयात्रेसाठी जवळपास १० लाख लोक उपस्थित राहण्याची शक्यता असल्यामुळे लाखो लोकांना संसर्ग होण्याची भीती याचिकेत व्यक्त करण्यात आली होती.