जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील कालींका माता मंदिर परिसरातील स्टेट बँकेवर काल टाकलेल्या दरोड्यातील आरोपींना अटक करण्यात आली असून यात कर्मचार्याचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
काल सकाळी कालींका माता मंदिर परिसरात असलेल्या स्टेट बँकेच्या शाखेवर दरोडा पडल्याने जळगाव हादरले होते. काल सकाळी ९ वाजता शाखा उघडण्यात आल्यानंतर कार्यालयीन चार ते पाच कर्मचारी उपस्थित होते. सव्वा नऊ वाजेच्या सुमारास दोन अनोळखी डोक्यात हेल्मेट घालून बँकेत घुसले. बँकेत हजर असलेल्या कर्मचार्यांना बेदम मारहाण करत त्यांच्याजवळील मोबाईल हस्तगत केला. त्यानंतर धमकावत सर्व कर्मचार्यांना कार्यालयातील शौचालायत कोंबून दिले. त्यानंतर बँक मॅनेजर राहूल मधुकर महाजन यांच्याकडे जावून लॉकरच्या चाव्या मागितल्या. याला प्रतिकार केल्यानंतर एका दरोडेखोराने हातात असलेल्या धारदार चाकून मॅनेजरच्या मांडीवर सपासप वार करून गंभीर जखमी केले. बँकेतील कर्मचारी नयन गिते यांच्यावर देखील वार केल्याने हाताच्या बोटाला दुखापत केली.
त्यानंतर दोन्ही दरोडेखोरांनी मॅनेजरला चाकूचा धाक दाखवून लॉकर उघडवून घेतले. लॉकरमध्ये ठेवलेली ३ कोटी ६० लाख रूपयांचे व १७ लाख रूपयांची रोकड असा एकुण ३ कोटी ७७ लाख रूपयांचा ऐवज आणि सीसीटीव्ही कॅमेर्याचा डीव्हीआर चोरून नेला. दोन्ही दरोडेखोर येतांना पायी डोक्यात हेल्मेट घालून आले होते. त्यानंतर बँक मॅनेजरचीच दुचाकी घेवून पसार झाले.
दरम्यान, हा दरोडा पडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी या गुन्ह्याची उकल करण्यासाठी विशेष पथकाची निर्मिती केली. यात एलसीबीचे प्रमुख किसनराव नजन-पाटील यांच्यासह इतरांचा समावेश होता. या पथकाने तपासाची चक्रे फिरवली असता त्यांना या प्रकरणाचा उलगडा झाला. या दरोड्यात बँकेतील एक कर्मचारी सहभागी असल्याचे आढळून आले. त्याने दिलेल्या जबानीवरून लुटारूंची ओळख निष्पन्न झाली.
या अनुषंगाने केलेल्या चौकशीनंतर पोलीस पथकाने सदर बँकेचा कर्मचारी आणि दोन लुटारूंना आहे. या संदर्भात पोलीस प्रशासन लवकरच पत्रकारांना अधिकृत माहिती देणार आहे. या वेळेस संबंधीत आरोपींची नावे जाहीर करण्यात येतील असे सांगण्यात आले आहे.