मुंबई वृत्तसंस्था । कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद करण्यात आल्या होत्या. ज्या ठिकाणी कोरोना संसर्ग कमी आहे त्या ठिकाणी पहिली ते बारावीचे वर्ग सुरू करण्याची मंजूरी ठाकरे सरकारने दिली असून २४ जानेवारी पासून असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करण्यासंदर्भातील फाईल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली होती. त्यावर शाळा २४ जानेवारीपासून सुरु करण्याची विनंती त्यांना केली होती. त्यांनी त्या फाईलला मंजुरी दिली आहे. ज्या ठिकाणी कोरोना संसर्ग कमी असेल तिथं 24 जानेवारी पासून शाळा सुरु होतील. शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, तहसीलदार असतील ते राज्य सरकारनं दिलेल्या नियमावलीचं पालन करुन निर्णय घेतील. सोमवारी २४ जानेवारीपासून शाळा सुरु होतील. पहिली ते बारावीचे वर्ग सुरु होतील पूर्व प्राथमिक वर्ग देखील सुरु होतील, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.
कोरोना रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणी शाळा सुरु करण्याचे अधिकार हे स्थानिक पातळीवर देण्यात आले आहेत. शाळा सुरु करण्याबाबत जारी करण्यात आलेली नियमावली जिथं पाळली जाईल तिथेच शाळा सुरु होतील, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून ऑनलाईन शिक्षण देखील सुरु ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.