जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद गावाजवळील कडगाव फाट्याजवळ भादली येथील तरूणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नशिराबाद पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.
संदेश लिलाधर आढाळे (वय-२२) रा. डोंगरकठोरा. ता. यावल ह.मु. भादली ता.जि.जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संदेश लिलाधर आढाळे हा तरूण आई वडीलांसह वास्तव्याला आहे. जळगावात एका खासगी फायनान्सक कंपनीत कामाला होता. संदेशचे वडील खासगी वाहन चालक असून ते नाशिक येथे राहतात. दरम्यान, बुधवार १० ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता संदेशचा मृतदेह नशिराबाद पोलीस हद्दीतील कडगाव रस्त्यावरील पाटचारीजवळील शेतात शेतात जाणाऱ्या मजूरांना आढळून आला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली. नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे, एएसआय अलियार खान, समाधान पाटील, किरण बाविस्कर, संजय जाधव, बाळू पाटील या पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून संदेश आढाळे याचा मृतदेह आल्याचे आढळून आले. त्याच्या पोटावर आणि डोक्यावर घाव असल्याने त्याचा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते. मयताच्या पश्चात वडील लिलाधर राघो आढाळे, आई छाया आणि विवाहित बहिण असा परिवार आहे. या घटनेबाबत पोलीसांनी चौकशीला सुरूवात केली आहे.