जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दौर्याच्या आधी राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांना आज तालुका पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
आज सायंकाळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जळगावातील पोलीस कवायत मैदानावर शासन आपल्या दारी उपक्रमाच्या अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, या कार्यक्रमाच्या दरम्यान आमदार एकनाथराव खडसे आणि त्यांच्या सहकार्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यात येणार असल्याचा इशारा दिला होता. यानंतर काल जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. यात बहुतांश मागण्या करण्यात आल्या असल्या तरी कपाशीच्या भावावर मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट न केल्यामुळे अडसर कायम राहिला असून खडसे हे आंदोलनावर ठाम आहेत.
दरम्यान, आज मुख्यमंत्री जळगावात दाखल होण्याआधी दुपारी बारा वाजेच्या सुमारास रोहिणी खडसे या आपल्या सहकारी पदाधिकार्यांसोबत पक्षाच्या जिल्हा कार्यालयात बसलेल्या असतांना त्यांना तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. आमचे मुक्ताईनगरचे प्रतिनिधी पंकज कपले यांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा देतांनाच शासन दडपशाही करत असून याचा निषेध केला.