ला पास: वृत्तसंस्था । बोलिव्हियामध्ये निवडणुकीत पुन्हा एकदा समाजवादी विचारांच्या उमेदवाराच्या पारड्यात मतदान केले आहे. मागील सरकारमध्ये असलेले अर्थ मंत्री लुइस आर्स यांनी राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीच्या मतमोजणीत आघाडी घेतली आहे.
मागील वर्षी निवडणुकीनंतर बोलिव्हियामध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय संघर्ष झाला. त्यावेळी इवा मोराल्स यांच्या नेतृत्वात निवडून आलेले समाजवादी सरकार विरोधकांनी उलथवून टाकले. मात्र, या वर्षी या निवडणूक निकालामुळे भांडवलशाही समर्थक अमेरिकेला धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे.
२०१९ मध्ये डाव्या विचारांचे ईव्हा मोरालस विजयी झाले होते. मात्र, या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार, अनागोंदी झाल्याचे सांगत विरोधी पक्षाने सरकारविरोधात आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला बोलिव्हियातील पोलिस, सैन्यातील गटांचा पाठिंबा मिळाला होता. यामागे अमेरिकेचा हात असल्याचा आरोप करण्यात येत होता.
अखेर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ईव्हा मोरालस यांनी अर्जेंटिनामध्ये शरणागती घ्यावी लागली. त्यानंतर विरोधी उजव्या विचारांच्या जीनिन अनेझ चावेझ यांना अंतरीम अध्यक्ष करण्यात आले. ईव्हा मोरालस यांना निवडणूक लढवण्यास आणि देशात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली. त्यानंतर निवडणूक पार पडली.
निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये समाजवादी विचारांचे आणि ‘ मूव्हमेंट टूवर्ड्स सोशलिझम’चे उमेदवार लुइस आर्स विजयी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीनुसार, लुइस आर्स यांना ५२ टक्के मते मिळाली आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष, कार्लो मेसा यांना ३१.५ टक्के मते मिळाली आहेत. मतमोजणीचा कल पाहता ‘मुव्हमेंट टूवर्ड्स सोशलिझम’चे उमेदवार लुइस आर्स यांचा विजय निश्चित समजला जात आहे. ‘मुव्हमेंट टूवर्ड्स सोशलिझम’च्या कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोषही सुरू केला आहे.
या निवडणुकीच्या मतमोजणीवर समाजवादी नेते आणि माजी राष्ट्राध्यक्ष ईव्हा मोरालस यांनी हा लोकशाही मूल्यांचा आणि लोकांचा समाजवादावरील असलेल्या विश्वासाचा विजय असल्याचे म्हटले आहे. नवीन समाजवादी सरकार स्थापन झाल्यानंतर मोरालस पुन्हा बोलिव्हियात परतण्याची दाट शक्यता आहे. नवीन सरकार समाजवादाच्या मार्गावरून चालणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बोलिव्हियातील निवडणूक निकालांचे क्यूबा, व्हेनेझुएला आदी देशांनी दक्षिण अमेरिकेतील डाव्या चळवळींनी स्वागत केले आहे.
ईव्हा मोरालस यांच्या पक्षाचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यामुळे अमेरिकेला मोठा धक्का बसला असल्याची चर्चा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर दक्षिण अमेरिकेतील समाजवादी सरकारांवर त्यांनी निर्बंध सुरू लादणे सुरू केला असल्याचा आरोप करण्यात येत होता. बोलिव्हियात झालेले राजकीय बंडदेखील अमेरिकेचे षडयंत्र असल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यामुळे बोलिव्हियातील विजय हा अमेरिकेच्या धोरणांना धक्का असल्याचे बोलले जात आहे.