जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बोगस चिनी लोन अॅप डाउनलोड करण्यास सांगून त्याद्वारे फिर्यादीची संशयित आरोपींनी सर्व माहिती काढून घेतली. त्यानंतर त्यांच्या विविध नातेवाईकांना अश्लील संदेश पाठविले. तसेच, १० लाखाच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशन, जळगावच्या अधिकाऱ्यांनी यशस्वी तपास लावला. थेट कर्नाटकातून भारतातील मास्टरमाईंड असणारे दोन संशयित गुन्हेगारांना पकडून आणले. तसेच, त्यांच्याकडून रक्कम जमा करून शुक्रवारी १२ मे रोजी पोलीस उपअधिक्षक संदिप गावित यांच्याहस्ते फिर्यादी यांना २ लाख रुपये परत देण्यात आले आहे.
सदर गुन्हयातील फिर्यादी हे पहुर, ता. जामनेर येथील रहिवाशी असुन त्यांनी ०९ जुलै ते दि. २१ सप्टेंबर २०२२ चे दरम्यान विविध नावाचे ऑनलाईन लोन देणारे ३५ मोबाईल लोन अॅप्लिकेशन फिर्यादी यांना मोबाईल मध्ये इंन्स्टॉल करण्यास सांगितले. त्याद्वारे फिर्यादी यांचे मोबाईल मधील सर्व कॉन्टॅक्ट लिस्ट, फोटो व इतर माहीती फिर्यादी यांचे मोबाईल मध्ये अनधिकृतरित्या प्रवेश करुन संशयित आरोपींनी चोरली होती. फिर्यादी यांनी पैशांची मागणी केलेली नसतांनाही फिर्यादी यांना लोन स्वरुपात ६,०८,७८५/- रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये ऑनलाईन पाठविले होते. सदर लोनचे पैसे व्याजासह परत करण्याच्या नावाखाली जिवे ठार मारण्याची धमकी देवुन जास्त पैशांची मागणी संशयित करीत असत.
सदर आरोपींनी फिर्यादी व त्यांचे मोबाईलमधील संपर्क यादीतील लोकांना फिर्यादी व त्यांच्या पत्नी बद्दल अश्लील व बदनामीकारक संदेश फिर्यादी व त्यांचे नातेवाईकांना व्हॉट्सअॅपवरती पाठविले आहे. फिर्यादी यांनी नातेवाईकांकडून उसणवारीने पैसे घेवुन आरोपींचे मागणी प्रमाणे वारंवार पैसे भरले. तरीही पुन्हा पुन्हा पैसे मागत. त्यामुळे फिर्यादी हे पुर्णपणे खचले होते. समाजात त्यांची व कुटुंबाची बदनामी झाली असल्याने त्यांचे मनात आत्महत्या करण्याचे विचार येत होते. अशावेळी त्यांनी सायबर पोलीस स्टेशन जळगांव येथे येवून त्यांचे सोबत झाले प्रकाराची हकीकत कथन केली. सायबर पोलीस स्टेशन जळगांव येथे त्यांचे फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी यांना संशयित आरोपींनी लोन स्वरुपात दिलेल्या ६,०८,७८५/- रुपयांवर व्याजरुपी खंडणीच्या स्वरुपात फिर्यादी यांचेकडुन अधिकचे ४,२३, ७१९/- रुपये खंडणीच्या स्वरुपात स्विकारले आहे.
सदर गुन्हयाचे तपासात पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर यांनी व त्यांचे अधिनस्त सायबर पो.स्टे. चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तपासाचे अनुषंगाने फिर्यादी यांना आलेले व्हॉट्सअॅप मॅसेज, व्हॉट्सअॅप कॉल, फिर्यादी यांनी ज्या मोबाईल अॅप्लीकेशन मधून लोन त्यांचे बँक खात्यामध्ये जमा झाले होते व फिर्यादी यांनी ज्या बँक खात्यामध्ये पैसे भरले आहे. अशा सर्व प्राप्त माहितीचे तांत्रिक विश्लेषण केले. आरोपी हे बेंगलोर, कर्नाटक व तामिळनाडू राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले होते. पोलीस अधीक्षक, जळगाव यांचे आदेशाने सदर गुन्हयातील आरोपी अटक करणेकामी व तपासकामी कर्नाटक राज्यातील बँगलोर येथे पोउपनि दिगंबर थोरात यांचे सोबत पोहेकॉ प्रविण वाघ, पोहेकॉ / राजेश चौधरी, पोना दिलीप चिंचोले, मपोना दिप्ती अनफाट, पोकॉ दिपक सोनवणे, पोका गौरव पाटील, पोकॉ अरविंद वानखेडे असे तपास पथक रवाना झाले होते.
सदर गुन्हयातील संशयित आरोपी प्रविण पिता गोविंदराज, वय-२८, अनापल्ली, अडगुडी, बेंगलुरु, कर्नाटका, सतिष पी, वय-३०, रा. ईजीपुरा, बेंगलुरु, कर्नाटक असे आरोपी अटक करुन त्यांचेकडुन फसवणुक रकमेपैकी २ लाख रुपये हस्तगत करण्यात आले होते. ते आज रोजी पोलीस उपअधिक्षक संदिप गावित यांचे हस्ते फिर्यादी यांना परत देण्यात आले आहे. सदर गुन्हयाचे तांत्रिक कामकाज हे सायबर पो.स्टे. येथील पोउपनि दिगंबर थोरात, पोना दिलीप चिंचोले व पोकॉ गौरव पाटील यांनी केले होते.