नवी दिल्ली प्रतिनिधी | नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान बनल्यानंतर मोठा गाजावाजा करत सुरू केलेल्या बेटी बचाओ-बेटी पढाओ या अभियानातील तब्बल ७९ टक्के रक्कम ही जाहिरातींवर खर्च करण्यात आल्याची माहिती सरकारने संसदेत दिली आहे.
या संदर्भात माहिती अशी की,बेटी बचाओ-बेटी पढाओ योजनेसाठी देण्यात आलेल्या निधीपैकी ७९ टक्के रक्कम जाहिरातींवर खर्च करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. संसदेत सादर करण्यात आलेल्या अहवालात ही आकडेवारी देण्यात आली आहे. या समितीचे नेतृत्त्व भाजपच्या नंदुरबार येथील खासदार हिना गावित यांच्याकडे आहे.
२०१६ ते २०१९ या कालावधीत बचाओ-बेटी पढाओ योजनेसाठी ४४६.७२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यापैकी ७८.९१ टक्के रक्कम मुलींच्या शिक्षण आणि आरोग्यावर खर्च करण्याऐवजी जाहिरातींवर खर्च केली गेली. बचाओ-बेटी पढाओचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यमांमध्ये अभियान राबवणं समितीला गरजेचं वाटतं असं समितीनं अहवालात नमूद केलं आहे. २०१६-१७ मध्ये अभियानावर अतिशय कमी खर्च करण्यात आल्याचं कॅगनं म्हटलं आहे. राज्यांच्या स्तरावर कामगिरी फारशी चांगली झालेली नसल्याचं म्हणत त्यांनी काही आकडेवारी दिली. २०१४-१५ आणि २०१९-२० च्या दरम्यान राज्यांनी केवळ १५६.४६ कोटी रुपयांचा वापर केला. या कालावधीत केंद्रानं राज्यांना ६५२ कोटी रुपये दिले होते. मात्र राज्यांनी केवळ २५.१३ टक्केच रक्कम वापरली.