पाटणा: वृत्तसंस्था । बिहार विधानभा निवडणुकासाठी भाजपने निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला पाच वर्षांसाठी ‘आत्मनिर्भर बिहार’चा रोडमॅप प्रसिद्ध करत कोरोना लसीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यानंतर बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला ही लस मोफत टोचली जाईल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या.
हे आमच्या निवडणुकीच्या जाहीरन्यातील वचन असून कोविड-१९ च्या लशीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू होताच बिहार मधील प्रत्येक व्यक्तीचे मोफत लसीकरण केले जाईल, असे त्या म्हणाल्या.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाटणा येथे भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. या जाहीरनाम्यात पुढील पाच वर्षांसाठी आत्मनिर्भर बिहारसाठी ५ सूत्र, १ लक्ष्य आणि ११ संकल्पांवर भर देण्यात आला आहे. या वेळी जाहीरनामा समितीचे अध्यक्ष डॉ. प्रेम कुमार, बिहार भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव, बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संजय जायसवाल उपस्थित होते.
बिहारी लोकांना राजकारण आणि इतर अनेक गोष्टींची चांगली समज आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले. जे बोलतो ते करतो असा देशात एकच पक्ष आहे. बिहारच्या जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. लॉकडाउननंतर पंतप्रधान मोदींनी गरिबांना मोफत धान्य देण्याची घोषणा केली होती. संपूर्ण देशाबरोबरच बिहारमध्ये देखील छठ पर्वापर्यंत गरिबांच्या घरापर्यंत धान्य पोहोचवले जात आहे, असे सीतारामन म्हणाल्या.
बिहार राज्याचा सन १९९० ते सन २००५ पर्यंत संपूर्ण अर्थसंकल्प सुमारे २३ हजार कोटी रुपये इतका होता, तर सन २००५ ते २०२० पर्यंत एनडीएचे सरकार असताना हा अर्थसंकल्प २ लाख ३० हजार कोटी रुपये इतका झाला आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री म्हणाल्या.