बिबट्याचा धुमाकूळ : वन खात्याने पिंजरे लावण्याची मागणी

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील नावरेसह परिसरातील शिवारात बिबट्याचे दर्शन घडले असून यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्मित झाले आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, भडगाव तालुक्यातील नावरे, वाडे आदी परिसरात सध्या बिबट्याची दहशत पसरली आहे. बुधवारी दुपारी इंदलसिंग परदेशी यांच्या केळीच्या शेतात सालदाराला बिबट्या दिसला. याआधी पवन पाटील यांच्या शेतातील गोठ्यातल्या वासराचा बिबट्याने फडशा पाडला.

दरम्यान, बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास नावरे शिवारात प्रकाश महाजन यांच्यावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्यांनी प्रसंगावधान राखून बाजूलाच असलेल्या घरात जात मधून कडी लाऊन घेतली. यानंतर त्यांनी माहिती दिल्यानंतर गावकरी येथे आले असता तोवर बिबट्या पसार झाला होता.

वन खात्याने नावरे, वाडे आदी शिवारात धुमाकूळ घालणार्‍या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावावेत अशी मागणी आता परिसरातून करण्यात येत आहे.

Protected Content