पाचोरा- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ! शहरातील बाहेरपुरा भागातील नागरिकांना परिसरातील विविध समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. अशात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत प्रांताधिकरी कार्यालय गाठत प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांना निवेदन दिले. व समस्यांचे निराकरण न झाल्यास येत्या १२ जूनपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
शहरातील बाहेरपुरा भागातील रसुल नगर, मच्छीबाजार, कुर्बान नगर, मोची गल्ली या परिसरात नागरिकांना विविध नागरी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत पाचोरा काॅंग्रेसने आक्रमक भूमिका घेत तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली आज ८ जुन रोजी समस्याग्रस्त नागरिकांसह थेट प्रांताधिकारी कार्यालय गाठत प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांच्या समोर समस्यांचा पाढा वाचला. दरम्यान परिसरात प्रामुख्याने नागरिकांची कोणतीही तक्रार नसताना महावितरण कंपनी इलेक्ट्रीक पोल वरुन जे – जे कनेक्शन धारक आहे. त्यांचे मीटर हे एका विशिष्ट बाॅक्स मध्ये इलेक्ट्रिक पोलवरच बसविण्याचे नियोजन करत आहे. सदर प्रकारामुळे नागरिकांना मीटर संदर्भात आधीच तांत्रिक दोषांची तक्रार असतांना संबंधित लाईनमन तातडीने येत नाही. त्यातच सायंकाळच्या सुमारास इलेक्ट्रीक पोलवर चडत नसुन त्यामुळे अशा अनेक समस्यांना स्थानिक नागरिकांनी सामोरे जावे लागत आहे. यासाठी इलेक्ट्रिक पोलवर मीटर लावण्याची सक्ती करु नये, रसुल नगर मधील गल्ली नं. २ भागातील भुयारी गटारीच्या कामात जो रस्ता काॅंक्रीटचा फोडलेला आहे. त्यावर पुन्हा सिमेंटचे काम करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला कामाचे पैसे मिळाले असुन देखील संबंधित ठेकेदाराने सदरचे सिमेंटचे काम केलेले नाही. चेंबर देखील बनविलेले नाहीत. आणि भुयारी गटारीचे कनेक्शन देखील जोडलेले नाही. येणाऱ्या पावसाळ्यामध्ये स्थानिकांना सामना करावा लागेल, पाचोरा पुरवठा विभागातील मागील काळात जो शिंगाडा मोर्चा काढण्यात आला होता. त्यातील लाभार्थ्यांना अद्यापही धान्य पुरवठा लेखी आश्वासन देऊनही मिळालेला नाही. यासोबतच आॅक्टोबर – २०२२ ते मार्च – २०२३ पर्यंत मोफत धान्य आणि विकत धान्य याची तात्काळ चौकशी व्हावी, तसेच पाचोरा – भडगाव तालुक्यातील उष्णता तापमान मापक हे कार्यान्वित नसुन या भागात तीव्र उष्णतेमुळे केळीसह फळ बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेता आलेला नसुन पाचोरा – भडगाव तालुक्यातील महसूल मंडळ येथील उष्णता तापमान मापक कार्यान्वित करण्यात यावे. अशा मागण्यांचे निवेदन पाचोरा काॅंग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी यांना देण्यात आले आहे. सदरच्या वरील समस्यांबाबत तातडीने आपल्या स्तरावरुन संबंधित विभाग प्रमुखांना आदेश देण्यात यावे. अन्यथा सनदशीर मार्गाने १२ जुन पासुन आंदोलन करावे लागणार असल्याचा इशारा देखील या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदन देते प्रसंगी काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, ओबीसी तालुकाध्यक्ष इरफान मणियार, महिला जिल्हा प्रतिनिधी अॅड. मनिषा पवार, मौलाना अमजद खान, स्थानिक नागरिक प्रकाश नाथेकरष, असलम टकारी, शेख शरीफ शेख मुसा, सलिम खान, युसुफ खान, दिलावर खान, रमेश देसाई, इकबाल मणियार सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.