अहमदनगर: वृत्तसंस्था । काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. बाळासाहेब विखे पाटील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्रत्वाचे संबंध होते. मात्र, आमच्या वडिलांनी ही गोष्ट आम्हाला कधीही सांगितली नव्हती. आता स्वत: मोदींनी ही गोष्ट सांगितली असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी शब्दबद्ध केलेल्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत व्हर्चुअल रॅलीच्या माध्यमातून १३ ऑक्टोबरला होणार आहे. जय्यत तयारी सध्या सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर नगर दक्षिण विभागातील भारतीय जनता पक्षासह विखे पाटील यांच्या समवेत काम केलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यामध्ये बोलताना विखे पाटील यांनी हा गौफ्यस्फोट केला.
या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने विखे पाटील शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात आणि राज्यासह देशाच्या राजकारणातही त्यांचे वडील स्वर्गीय डॉ. विखे पाटील यांचे वेगळे वजन होते. मधला काही काळ शिवसेनेचा सोडला तर डॉ. विखे पाटील शेवटपर्यंत काँग्रेससोबत राहिले. मात्र, भाजपशी त्यांचा तसा थेट संबंध कधीही आला नव्हता. मात्र, मोदींशी असलेले त्यांचे मित्रत्वाचे संबंध आता पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने अचानक पुढे आले आहेत. विशेष म्हणजे स्वत: मोदींनी हे सांगितल्याचा दावा विखे पाटील यांनी केला आहे.
विखे पाटील म्हणाले, ‘या आत्मचरित्राचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे आशी विखे पाटलांची इच्छा होती. त्यांच्या निधनानंतर हे प्रकाशन राहून गेले होते. एप्रिलमध्ये पंतप्रधानानी स्वत: लोणीतील प्रकाशन समारंभासाठी येण्याचे मान्य केले होते. परंतू लॉकडाऊनमुळे शक्य झाले नाही. पंतप्रधान कार्यालयानेच आता प्रकाशन समारंभाची तारीख निश्चित केली आहे.
पंतप्रधान मोदींशी असलेले मित्रत्वाचे संबध आमच्या वडिलांनी आम्हाला कधीही सांगितले नव्हते. पण निमंत्रण देण्यासाठी गेल्यानंतर पंतप्रधानांनीच या आठवणींना उजाळा दिला. डॉ. विखे पाटील प्रश्नांवर परखडपणे मत मांडत राहिले. सतेला कधी कधी भुलले नाहीत. त्यांना नमन करण्यासाठी लोणीलाच येण्याची इच्छा मोदींनी व्यक्त केली होती.’
या कार्यक्रमाच्या निमित्ताने विखे पाटील यांनी जोरदार मोर्चेबांधणी केल्याचे दिसून येते. विखे पाटील यांना मानणारे जुने कार्यकर्ते जोडण्यासोबतच थेट पंतप्रधानांशी जवळीक साधून पक्षातील आपले स्थान अधिक घट्ट करण्याचा विखे पिता-पुत्रांचा प्रयत्न यातून दिसून येतो.
काँग्रेस संस्कृतीत वाढलेल्या, जगलेल्या विखे पाटील यांनी आपल्या या आत्मचरित्रात काय लिहून ठेवले आहे, विखे यांच्या सध्याच्या राजकारणासाठी त्यातील काही अनुकूल आहे, काय प्रतिकूल आहे, हे पुस्तक आल्यावरच उघड होणार आहे.