‘बाळासाहेब, पुन्हा जन्माला या’; संपकरी एसटी कर्मचार्‍यांची भावनिक साद

जळगाव प्रतिनिधी । एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे यासह विविध मागण्यांसाठी जळगाव बस आगारात गेल्या नऊ दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनातील कर्मचाऱ्यांनी आज हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती जागविल्या. बाळासाहेब, पुन्हा जन्माला या अशी एसटी कर्मचाऱ्यांनी फलक लावून भावनिक साद दिली.

एसटी महामंडळात कुणी भगिनी नुकतीच आपल्या तान्ह्या बाळाला दूध पाजून कंडक्टर म्हणून कामावर हजर झालीये. कुणी ड्रायव्हर आपला जिवलग माणूस गेल्याचं कळल्यावरही बस मुक्कामाला पोहचवण्याची जबाबदारी पार पाडूनचं गावी गेलाय. कुणा कर्मचाऱ्याला आपल्या कुटूंबापासून दूर राहत मुक्कामाच्या बसवर रात्री मुक्कामी थांबावं लागलंय. ‘पापी पेट के लिए’ हे सर्व करण्याची त्यांची मानसिकताही आहे पण प्रामाणिकपणे कार्य करत आपल्या न्याय मागण्यांसाठी, हक्कासाठी त्यांना झगडावं लागत असेल तर… ‘संप मागे घ्या अन्यथा नोकरीवर गदा येईल…’ अशी टांगती तलवार डोक्यावर असेल तर… तर, ‘कामगार आहे, मी तळपती तलवार आहे…
सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे. ”

या नारायण सुर्वे यांच्या कवितेप्रमाणे भावनांचा उद्रेक झाल्याशिवाय राहील काय ? याच भावनेतून जात भारतीय लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा वापर करत महाराष्ट्रातील प्रवासासाठीची मोठी लाईफलाईन असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या आठ नऊ दिवसांपासून संप सुरु आहे. सण असो, वार असो… पाऊस असो, पाणी असो, घरातील सदस्याचा वाढदिवस असो, आप्त स्वकीयांचं लग्न असो अशा अनेक प्रसंगी आपल्या जबाबदारीला प्राधान्य देत कार्य करणारे एसटी कामगार सरकार दरबारी आपल्या मागण्या मागत आहेत.

जळगावातही विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असून उर्मिला सूर्यवंशी आणि यशोदा पांढरे यांनी ‘लाईव्ह ट्रेंड न्यूज’शी बोलतांना सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीनं आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी कामगारांशी, त्यांच्या व्यथा, वेदनेशी नातं असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा देत बाळासाहेब आज असते तर आज आम्हाला संप, आंदोलन करण्याची गरज भासली नसती म्हणत ‘बाळासाहेब, तुम्ही पुन्हा जन्माला या’ अशी भावनिक साद घातली. एसटी कर्मचार्‍यांनी आहे त्या पगारातच भागवावं” असं वक्तव्य करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा आज एसटी कर्मचार्‍यांनी तीव्र निषेध केला. संप कुठल्याही संघटनेचा आणि पक्षाचा नसून कामगारांचा आहे असं सांगत कायद्याच्या कक्षेतच शासनाच्या विरोधातील विलीनीकरणाचा आपला लढा कायमच राहणार असल्याचा इशारा यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी दिला. कुणी व्यवस्थेबद्दल संताप व्यक्त करतंय तर कुणी हात जोडून विनवणी असं संमिश्र चित्र यावेळी पाहायला मिळालं.

Protected Content